ऊसाच्या रिकाम्या ट्रॉलीचे चाक पायावरून गेल्याने कुमठेतील 12 वर्षीय मुलीचा मृत्यू

0
2

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर ऊस वाहतुकीच्या रिकाम्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा धक्का लागून रस्त्यावर खाली पडलेल्या बारा वर्षीय मुलीच्या पायावरून त्याच ट्रॉलीचे चाक गेल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलीला पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला.

याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रॅक्टर चालकास अटक करण्यात आली आहे. अपघातग्रस्त ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, कुमठे येथील शेतकरी सादिक मुलानी हे आपली बारा वर्षीय कन्या आफरीन हिच्या समवेत कोरेगाव शहरात बुधवारी दुपारी आले होते. कोरेगाव शहरातील कामे आटोपून ते कुमठे येथे परत जाण्यासाठी निघाले होते. पंचायत समितीच्या अलिकडे एका बांगड्याच्या दुकानासमोर ते उभे राहिले होते. त्यांच्या दुचाकीवर आफरीन ही बारा वर्षे मुलगी बसली होती. त्याच दरम्यान रिकाम्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा धक्का तिला लागला आणि ती रस्त्यावर पडली.

दुसऱ्या ट्रॉलीचे चाक तिच्या पायावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने कोरेगावातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने सातारच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिथून पुण्याच्या ससून रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले. सायंकाळी ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली असता तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

याप्रकरणी सादिक मुलानी यांनी तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करून ट्रॅक्टर चालक कृष्णा बाबासाहेब मुंडे, (रा. चारदरी, ता. धारूर जि. बीड) याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे तपास करत आहेत.