जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन 150 फूट दरीत कोसळले; साताऱ्याच्या कामेरीतील सुपुत्राला वीरमरण

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । जम्मू-काश्मीरमधील पूंछ भागातील मेंढर येथे नियंत्रण रेषेजवळ बलनोई परिसरात सैनिकांना घेऊन जाणारे लष्कराचे वाहन दरीत कोसळून पाच जवान शहीद झाल्याची घटना काल मंगळवारी घडली. मंगळवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात शहीद झालेल्या 5 जवानामध्ये 11 मराठा रेजिमेंटमध्ये देशसेवा करणारे सातारा जिल्ह्यातील कामेरी गावचे सुपूत्र शुभम समाधान घाडगे (वय 28) यांचा समावेश आहे.

शहीद जवान शुभम यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामेरी येथे झाले तर माध्यमिक शिक्षण शंकरराव आनंदराव घाडगे विद्यालय पार पडले. यानंतर शुभम यांनी महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती शिवाजी काँलेज अपशिंगे मि. येथे पूर्ण करून लष्करात भरती झाले.

शुभम यांच्या जाण्याने कामेरी गावासह पंचक्रोशी व संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. संपूर्ण कामेरी गाव आपल्या सुपूत्राला आलेल्या वीरमरणामुळे सुन्न झाले असून शुभमच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.

नेमकी कशी घडली घटना?

भारतीय लष्कराचे वाहन पुंछमधील मेंढर येथे 150 फूट खोल दरीत मंगळवारी सायंकाळच्यावेळी कोसळले. यावेळी वाहनातून एकूण 18 सैनिक प्रवास करत होते. त्यापैकी 6 जवान गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व जवान 11 मराठा रेजिमेंटचे होते, जे नियंत्रण रेषेकडे (एलओसी) जात होते. त्याचवेळी मागून येणाऱ्या लष्करी वाहनातील इतर सैनिक खाली उतरले आणि त्यांनी सर्व सैनिकांना खड्ड्यातून बाहेर काढले आणि जवळच्या लष्करी रुग्णालयात नेले. रुग्णालयात पाच जवानांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर इतर पाच जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी लष्करी रुग्णालयात पूंछमध्ये पाठवण्यात आले, या ठिकाणी सर्वांवर उपचार सुरू आहेत.