सातारा प्रतिनिधी । सातारा शहरात वारंवार पाणी पुरवठा नलिकांमध्ये लिकेज होऊन पाणीटंचाई निर्माण होत असते. शहरातील पाणी पुरवठा हा सुरळीत आणि अत्याधुनिक पद्धतीने व्हावा यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जातात. दरम्यान, आता सातारा पालिकेच्या माध्यमातून पाणी योजनेचे अत्याधुनिकीकरण केले जात असून शहरात २१ हजार स्वयंचलित मीटर बसविले जाणार आहेत. केंद्र व राज्य शासनाची ही योजना असल्याने मीटरसाठी नागरिकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. उलट सध्या आहे त्या दरानेच नागरिकांना याहीपुढे पाणीपुरवठा केला जाणार आहे.
पालिकेत नुकतीच पार पडली महत्वाची बैठक
सातारा शहरात सुरु करण्यात स्वयंचलित पाणी योजनेचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नुकतीच एक बैठक पार पडली. याबैठकीला माजी नगरसेविका स्मिता घोडके, सीता हादगे, लता पवार, अनिता घोपडे, माजी नगरसेवक मनोज शेंडे, धनंजय जांभळे, अविनाश कदम, अमोल मोहिते, श्रीकांत आंबेकर, राम हादगे यांच्यासह पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे, अभियंता दिलीप चिद्रे आदी उपस्थित होते.
योजना नेमकी कशा पद्धतीने कार्यान्वित केली जाणार?
या बैठकीत मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी ही योजना नेमकी कशा प्रकारे कार्यान्वित याबाबत माहिती दिली. ‘कास धरणाची उंची वाढविण्यात आल्यानंतर नवीन जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले. त्याचबरोबर पालिकेने केंद्र व राज्य शासनाच्या अमृत २.० योजनेतून शहराच्या पाणीपुरवठ्यात अत्याधुनिकता आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ज्या भागात कास व शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, त्या भागात अत्याधुनिक २१ हजार स्मार्ट मीटर बसविले जाणार आहेत. ही संपूर्ण योजना स्वयंचलित असून, धरणातून उचललेले पाणी, पाण्याचे वितरण, जलवाहिनीची गळती, पाणी टाकी ओव्हरफ्लो होणे अशा सर्व बाबी सेंसरप्रणालीमुळे पालिकेला एका ठिकाणी कळणार आहेत.
पालिकेच्या मुख्य कार्यालयातून यंत्रणा हाताळली जाणार
कराड शहरात नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या नव्या मीटरच्या या योजनेची यंत्रणा हि सातारा पालिकेच्या मुख्य कार्यालयातून हाताळली जाणार आहे. पाणी मीटरमध्ये जीपीएस प्रणाली असल्यामुळे त्याची चोरीही पकडली जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये – गुरुकुल टाकीजवळ प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा उभारली जाणार असून, या भागात चोवीस बाय सात पाणीयोजना राबविली जाईल.
अशी आहे योजना…
शासनाच्या अमृत २.० योजनेतून हा प्रकल्प आकाराला येत आहे. या प्रकल्पांतर्गत सांबरवाडी व जकातवाडी जलशुद्धीकरण केंद्राचे स्वयंचलन ‘स्केंडा’ प्रणालीद्वारे केले जाईल. ठिकठिकाणी इलेक्ट्रो मॅग्नेटिक फ्लो मीटर, प्रेशर ट्रान्समीटर, बल्क मीटर बसविले जाणार आहेत. ही यंत्रणा लोरा कम्युनिकेशन प्रणालीला जोडली जाणार आहे. जिथे हे मीटर बसविले जाणार तिथे असलेल्या मोडेममध्ये मोबाइलप्रमाणे सिम कार्ड असणार आहे. या मोडेमद्वारे सिग्नलची देवाण-घेवाण होणार आहे. याच्या माध्यमातून पाण्याचा दाब, त्याचा वापर, पाण्याची गरज याचे नियंत्रण व वितरण पालिकेतील नियंत्रण कक्षाला एका क्लिकवर करता येणार आहे.