पालकमंत्रीपद आपल्या पक्षाला मिळावं असं प्रत्येकाला वाटतं; खा. उदयनराजेंच्या विधानावर मंत्री शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर

0
4

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पाल्कमंत्रीपदाबाबत सर्वत्र चर्चा सुरु असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी विधानसभेच्या संख्याबळाचा विचार करता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद शिवेंद्रराजे भोसले यांनाच मिळायला हवे, अशी भूमिका मांडली. त्यांच्यानंतर आता पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील पालकमंत्री पदावरून महत्वाचे विधान केले आहे. “पालकमंत्री पद स्वतःला मिळावे, स्वतःच्या पक्षाला मिळावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र, हा अधिकार आम्हाला कोणालाच नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा तो अधिकार आहे. जोपर्यंत या तिघांचे पालकमंत्री कोणाला करायचे यावर शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. पण जर खासदार उदयनराजे याबाबत काही बोलले असतील तर ते त्यांचे व्यक्तिगत मत असू शकते, असे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहार.

मंत्री शंभूराज देसाई यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर पर्यटनासारखी महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे. महाराष्ट्रात पर्यटनाला मोठी संधी असून ऐतिहासिक परंपरा असलेल्या गड किल्ले यांचे संवर्धन करुन गडकोट पर्यटन वाढवण्यावर भर देणार आहे. आत्ताच्या पर्यटन स्थळांमध्ये आधुनिक सुधारणा करुन विकास केला जाणार आहे.

महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत पूर्वीच्या मंत्र्यांनी काय केलेले आहे? स्थानिकांचा किती सहभाग आहे? त्या सर्वांचा आढावा घेऊन याबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, असे मंत्री देसाई यांनी यावेळी म्हंटले आहे.

पालकमंत्रीपदाबाबत खा. उदयनराजे नेमकं काय म्हणाले?

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी खा. श्री. छ.उदयनराजे भोसले यांची ‘जलमंदिर पॅलेस’या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. खा. उदयनराजे भोसले यांनी ना. शिवेंद्रराजे भोसले यांचे स्वागत केले. त्यानंतर खा. उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, सातारा जिल्ह्यात महायुतीची ताकद वाढली आहे. पालकमंत्रिपदाचा आग्रह करण्यापेक्षा पक्षश्रेष्ठींनी काहीतरी ठरवले असेल. मात्र, विधानसभेच्या संख्याबळाचा विचार करता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद ना. शिवेंद्रराजे भोसले यांनाच मिळायला हवे. प्रत्येकाला संधी मिळायला हवी. सर्वांना सोबत घेऊन जाणार्‍या सर्वसमावेशक नेत्याला पालकमंत्रिपद द्यायला हवे, अशी भूमिका खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी मांडली.