कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यासह कराड शहरात गल्लीबोळं जास्त आहेत पण त्याहूनही जास्त आहे त्या गल्लीबोळात फिरणाऱ्या मोकाट श्वानांची संख्या़ अधिक पहायला मिळते. या श्वानांनी मागील अकरा महिन्यात अनेक नागरिकांवर हल्ल केला आहे. जिल्ह्यात गेल्या अकरा महिन्यांत भटक्या श्वानांनी रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या १९ नागरिकांचे लचके तोडले आहेत. यामध्ये काहीजण गंभीर जखमी झाले तर काहींवर तातडीने उपचार झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. भटक्या कुत्र्यांपासून नागरिकांच्या जीवाला धोका आहे. तसेच लहान मुलांवरही भठकी कुत्री अचानक हल्ला करतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना एकटे सोडू नये, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात विशेष करून तब्बल तीन हजार मोकाट श्वान वावरत असल्याचा दावा ‘अनिमल प्रोटेक्शन क्लब’च्यावतीने मागील काही वर्षात करण्यात आला होता. त्यानंतर येथील पालिका आणि ‘अनिमल प्रोटेक्शन क्लब’च्यावतीने तीनवेळा नसबंदी करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. सध्या कराड शहरात रात्रीच्यावेळी काही मोकाट श्वान शहरातील पेठांमधील रस्त्यांवर वावरत आहेत. त्यांच्याकडून रस्त्यावरून चालत निघालेल्या नागरिकांवर व लहान मुलांवर हल्ले देखील केले जात आहेत.
११ महिन्यांत १९ जणांना चावा
सातारा जिल्ह्यात गेल्या ११ महिन्यांत १९ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. या सर्व रुग्णांवर तातडीने उपचार झाल्याने त्यांचे जीव वाचले. मात्र, भटक्या कुत्र्यांची दहशत नागरिकांमध्ये दिसून येते.
सर्वाधिक घटना एप्रिल-मे मध्ये
सातारा जिल्ह्यात कुत्र्याने चावा घेतलेल्या सर्वाधिक १६ घटना या एप्रिल आणि मे महिन्यांत घडल्या आहेत.
चाव्यानंतर ‘अॅन्टी रेबीज’ आवश्यक
कुत्रा चावल्यानंतर तातडीने रुग्णाला अॅन्टी रेबीजचे इंजेक्शन दिले जाते. जेणेकरून रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढून रुग्ण लवकर यातून बरा व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातात.
शासकीय रुग्णालयात इतकी आहेत रेबीज इंजेक्शन?
शासकीय रुग्णालयात रेबीज इंजेक्शनचा साठा पुरेसा आहे. कुत्रा चावलेला रुग्ण सिव्हिलमध्ये आल्यानंतर त्याच्यावर तातडीने उपचार केले जातात. आठ ते दहा दिवस त्याच्यावर देखरेख ठेवली जाते. काही रुग्ण रुग्णालयात दाखल न होता इंजेक्शन करून परत घरीसुद्धा जातात.
२००३ साली घडली होती बालिकेवर श्वानाच्या हल्ल्याची घटना
कराड शहरातील रुक्मिणीनगरमध्ये एका बालिकेवर श्वानाच्या हल्ल्याची घटना २००३ साली घडली होती. त्यावेळी श्वानांची नसबंदी करण्याबाबत ‘अॅनिमल प्रोटेक्शन’च्यावतीने पालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, पालिकेकडून त्या पत्रव्यवहाराला कसलाच प्रतिसाद मिळाला नाही़. पालिकेने मोकाट श्वानांचा प्रश्न त्यावेळी गांभीर्याने घेतला नाही़. सुमारे आठ वर्षांपूर्वी नसबंदीची ही मोहीम राबविण्यात आली़. ‘अॅनिमल प्रोटेक्शन’च्या सदस्यांनी शहरातील गल्लीबोळांत फिरून श्वान पकडले व शस्त्रक्रिया केली़. त्यावेळी सुमारे दीड हजार श्वानांवर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर गतवर्षीही अशीच मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी सुमारे १ हजार ७०० श्वानांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
मोकाट श्वान का पिसाळतात ?
१) वातावरणामध्ये होणाऱ्या बदलाचा सर्वात जास्त परिणाम श्वानांवर होत असतो़ त्यामुळे वातावरण बदलल्यास श्वान पिसाळण्याची शक्यता जास्त असते़.
२) श्वानांना वेळेत अन्न न मिळाल्यास अथवा त्यांची उपासमार झाल्यासही त्यांच्या वागण्यात फरक पडतो़.
३) सर्वसाधारणपणे घाण आणि दलदल असलेल्या ठिकाणी श्वानांचा वावर जास्त असतो़ गढूळ पाणी पिल्यासही ते पिसाळतात़.
४) रस्त्याकडेला पडलेले मांस श्वान खातात़ एखाद्या श्वानाला मांसाची चटक लागलीच तर ते पिसाळण्याची शक्यता जास्त असते़.
५) उपाशी असताना श्वानाला वारंवार हुसकावले़ त्याला दगड मारले तर तो तापट बनण्याची व हल्ला करण्याची शक्यता असते़.
श्वानांना ‘व्ही’ आकाराचे ‘टॅगिंग’
मोकाट श्वान पकडून त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांना सोडून देण्यात येते. मात्र, शस्त्रक्रिया झालेली श्वान ओळखून येण्यासाठी त्यांच्या कानाला ‘व्ही’ आकाराचे ‘टॅगिंग’ केले जाते. तीन वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया करून अशा प्रकारचे ‘टॅगिंग’ करण्यात आले होते.
श्वान पकडताना खबरदारी…
मोकाट श्वानांचा शोध घेऊन ती पकडणे सहज सोपे नसते. ज्यावेळी अशी मोहीम राबविली जाते, त्यावेळी अॅनिमल वेलफेअरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शहर परिसर पिंजून काढावा लागतो. मोकाट श्वान दिसताच त्यांना इजा न होता पकडावे लागते. हे काम करताना हल्ला होण्याची दाट शक्यता असते. तसेच श्वानाला दुखापत होऊ शकते, त्यामुळे खबरदारी घ्यावी लागते.