कराड प्रतिनिधी । गाईच्या दुधाला ४० रुपये प्रतिलिटर व म्हशीच्या दुधाला ७० रुपये प्रतिलिटर दर मिळावा, पशुखाद्याचे दर कमी करावेत किंवा रासायनिक खत युरियाला ज्या पध्दतीने शासकीय अनुदान देण्यात येते, त्या धर्तीवर पशुखाद्यालाही अनुदान देण्यात यावे, दुधाला ऊसाप्रमाणे ८०-२० फॉर्म्युला आणून एफ. आर. पी. कायदा लागू करावा यासह विविध महत्वाच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आज सातारा जिल्ह्यात कराड उत्तर तालुक्यासह वडोली निलेश्वर, नागठाणे, कराड, आर्वी आदी ठिकाणी आंदोलनास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी नागठाणे या ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यानी रस्त्यावर दूध ओतून निषेध नोंदवला.
संपूर्ण सातारा जिल्ह्यात आज बेमुदत दुध आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. त्यानुसार आज सकाळी दहा वाजल्यापासून आंदोलनास सुरुवात करण्यात आली असून जिल्ह्यातून होणारी इतर जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुध वाहतूक काही ठिकाणी बंद करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांनी आज दूध संकलन केंद्रांना दूध नसल्याने मोठ्या प्रमाणात संघांकडे दुधाचा तुटवडा जाणवणार आहे.
पशु खाद्याचे दर भरमसाठ वाढलेले आहेत तसेच उत्पादन खर्च देखील वाढलेला आहे. अशा परिस्थितीत खरं तर दुधाला ३८ रुपयांपेक्षा जास्त भाव हा मिळायला हवा होता. पण प्रत्यक्षात सातारा जिल्ह्यातील दूध संघानी दुधाचे भाव कमी केलेले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरलेला आहे.
काहीही झालं तरी आता मागे हटणार नाही : प्रमोदसिह जगदाळे
आज सकाळपासून संपूर्ण सातारा जिल्ह्यात बेमुदत दूध बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. जोपर्यंत आपल्या चौदा मागण्या शासन मान्य करत नाही तो पर्यंत दूध उत्पादक शेतकऱ्याने आपले दूध डेअरीला घातलेले नसून आम्ही दूध दरवाढी संदर्भात कराड तहसीलदार कार्यालयापासून आंदोलनास सुरुवात केली आहे. जास्तीतजास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी आवाहन केले असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कराड उत्तरचे अध्यक्ष प्रमोदसिह जगदाळे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली आहे.
बळीराजा संघटनेचा आंदोलनास पाठिंबा : पंजाबराव पाटील
सातारा जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध दरासाठी पुकारलेल्या आंदोलनाला बळीराजा शेतकरी संघटनेचा जाहीर पाठिंबा आम्ही येत आहोत. शेतकरी बंधूंनो आज रोजी शेतकऱ्यांच्या कोणत्या शेतमालाला व दुधाला हमीभाव मिळत नाही. सर्व साखर कारखानदार दूध डेरी मालक संघटित पणाने शेतकऱ्यांची लूट करत आहेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने दूध दरासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. आंदोलनाशिवाय सरकार दुसरी भाषा समजत नाही यासाठी आपण सर्वांनी आंदोलनात सहभागी होऊ या आणि आपल्या दुधाला व ऊसाला हमीभाव मिळवू या बळीराजा शेतकरी संघटना या आंदोलनात सर्व ताकदीनिशी शेतकऱ्यांच्या बरोबर उभी राहील हे वचन मी आपल्याला देत असल्याची प्रतिक्रिया बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक पंजाबराव पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
कराड तहसील कार्यालयाबाहेर घातला दुग्धाभिषेक
कराड तहसीलदार कार्यालयासमोर आज दुपारी ठीक बारा वाजण्याच्या सुमारास कराड उत्तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रमोदसिह जगदाळे यांच्यासह कार्यकर्ते एकत्र झाले. यावेळी त्यांनी तहसील कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक मुर्तीला दुग्धाभिषेक घातला. यावेळी शासनाने दुधाबाबत केलेल्या चौदा मागण्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी देखील केली.
कोणेगांवमध्ये 100 टक्के दूध बंद
कराड उत्तर तालुक्यातील कोणेगाव येथे सर्व दूध उत्पादक व संकलन केंद्र चालकांच्या वतीने दूध सकळां केंद्र बंद ठेवत आंदोलनास सहभाग घेतला. यावेळी आभार
नागठाणेत दूध उत्पादक शेतकरी आक्रमक
सातारा जिल्ह्यातील नागठाणेमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने दूध रस्त्यावर ओतून आक्रोश व्यक्त करण्यात आला. यावेळी नागठाणेचे माजी उपसरपंच श्री घनश्याम ताटे, नागठाणे विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन श्री संजय साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य श्री दत्तात्रय साळुंखे, ज्येष्ठ नागरिक एकनाथ साळुंखे, नारायण साळुंखे, अक्षय साळुंखे, सचिन साळुंखे तसेच श्री अशोक ताटे, श्री जालिंदर साळुंखे, श्री दिनकर साळुंखे आप्पा, रि. मेजर श्री नलवडे, सिद्धनाथ दूध संकलनचे श्री युवराज साळुंखे, श्री सचिन केंजळे, श्री संजय पवार, दीपक साळुंखे ,श्री निवृत्ती साळुंखे भाऊ, नवनाथ साळुंखे याशेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.
‘या’ आहेत प्रमुख 14 मागण्या
१) गाईच्या दुधाला ४० रुपये प्रतिलिटर व म्हशीच्या दुधाला ७० रुपये प्रतिलिटर दर मिळावा.
२) पशुखाद्याचे दर कमी करावेत किंवा रासायनिक खत युरियाला ज्या पध्दतीने शासकीय अनुदान देण्यात येते, त्या धर्तीवर पशुखाद्यालाही अनुदान देण्यात यावे.
३) दुध उत्पादक शेतकऱ्यांना या व्यवसायाची शाश्वती मिळेल यासाठी शासनाने ठोस “दुध धोरण’ तयार करावे.
४) इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याने दुधाचा स्वतःचा एक ब्रँड विकसीत करावा.
५) दुधाला ऊसाप्रमाणे ८०-२० फॉर्म्युला आणून एफ. आर. पी. कायदा लागू करावा.
६) दुधामधील खासगी व सहकारी लुटमार विरोधी कायदा करावा.
७) सदोष मिल्क मिटरमधून होणारी लुटमार थांबवावी.
८) सातारा जिल्ह्यातील सर्व खाजगी व सहकारी दुध संघाने कोल्हापूर, सांगली जिल्ह्याप्रमाणेच दुधाला दर द्यावेत.
९) तालुकावार मिल्कोमीटर टेस्टींग तपासणी भरारी पथक नियुक्त करावे.
१०) शासनाची जनावरे विमा योजना पुन्हा सुरु करावी.
११) राज्यातीली दुध दर निश्चित करण्यासाठी गठीत केलेल्या समितीमध्ये शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व दुध उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करावा.
१२) दुध भेसळ रोखण्यासाठी गठीत केलेल्या जिल्हास्तरीय समितीमध्ये शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व दुध उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करावा.
१३) महाराष्ट्र राज्यातील सर्व सहकारी दुध संस्था / दूध संघांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७९अ अन्वये या कायद्याचे पालन न करणाऱ्या दुध संघावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
१४) शासनाकडून दुध उत्पादकांना मिळणारे प्रतिलिटर अनुदान तातडीने दुध उत्पादकांच्या बैंक खात्यात जमा करावे.