उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदेसह 3 दिवसांसाठी दरे मुक्कामी

0
3

सातारा प्रतिनिधी | नुकतीच राज्याच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली आहे. त्यानंतर राज्यातील मंत्रिपदाचे खाते वाटप करण्यात आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपला मुलगा खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह तीन दिवसांच्या दौर्‍यावर महाबळेश्र्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब ठिकाणी रविवारी सायंकाळी दाखल झाले. उपमुख्यमंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टर सायंकाळी गावानजीक केलेल्या हेलिपॅडवर उतरले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

एकनाथ शिंदे यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री असताना मागील महिन्यात देखील आपल्या दरे या गावी हजेरी लावली होती. मात्र, यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून प्रथमच आपल्या गावी आले. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने देखील त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांचा हा दौरा खासगी मानला जात असून ते राज्यातील घडामोडींवर काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेला 9 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपद

शिवसेना शिंदे गटाकडून 11 आमदारांनी गेल्या आठवड्यात नागपुरात मंत्रिपदाची शपथ घेतली होती. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ही महत्त्वाची खाती तर उदय सामंत यांच्याकडे उद्योग आणि मराठी भाषा मंत्रालये देण्यात आली आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि शालेय शिक्षण यासारखी महत्त्वाची खाती अनुक्रमे प्रकाश आबिटकर आणि दादा भुसे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. भरत गोगावले यांच्याकडे परिवहन, गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा आणि स्वच्छता, संजय राठोड यांच्याकडे मृद व जलसंधारण, पर्यटन, खाणकाम, शंभूराज देसाई यांच्याकडे माजी सैनिक कल्याण आणि संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्रिपदांव्यतिरिक्त, पक्षाला राज्यमंत्रीपदेही मिळाली आहेत. आशिष जैस्वाल यांच्याकडे वित्त आणि नियोजन, कृषी, मदत आणि पुनर्वसन, कायदा आणि न्यायव्यवस्था, कामगार, योगेश कदम यांना गृह (शहरी), महसूल, ग्रामीण विकास आणि पंचायती राज, अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न या खात्यांचे राज्यमंत्री बनवण्यात आले आहे. नवीन सरकारमध्ये नऊ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री शिवसेनेला मिळाले आहे. शिवसेनेने पाच जणांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. तर तीन जणांना मंत्रिमंडळातुन वगळले आहे.