मिनी काश्मीर महाबळेश्वरमध्ये आढळले दुर्मिळ प्रजातीचे ‘वटवाघूळ’

0
49
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सह्याद्री पर्वतरांगा या अद्भूत प्रकारांची जैवविविधता पाहण्यासाठी एक महत्त्वाचा भाग असून या भागात बरेच अद्भूत असे जीव आढळतात. सह्याद्रीच्या भागातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ महाबळेश्वर देखील जैव विविधतेने नटलेले आहे. येथील विविध भागात वन्यजीवांबरोबरच वटवाघळांच्या बऱ्याच प्रजाती आढळतात. यातच येथे वटवाघळाची एक दुर्मिळ प्रजाती नुकतीच आढळली असून या प्रजातीस ‘पेंटेड बॅट’ या नावाने ओळखले जाते.

महाबळेश्वरचा बराचसा परिसर जंगलांनी दऱ्याखोऱ्यांनी व्यापला असून बराच खडकाळ भाग देखील आहे. येथील तापोळा भाग तसेच महाबळेश्वर शहरानजिक असणाऱ्या खडकाळ भागातील गुहांमध्ये तसेच शहरी भागात देखील विविध वटवाघळांच्या प्रजाती पाहावयास मिळतात. दरम्यान, महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या सरफराज शेख यांच्या घरात नुकतेच हे दुर्मिळ वटवाघूळ आढळले.

नारंगी रंग, पंखावर काळे त्रिकोणी पट्टे शरीराची लांबी ३ ते ५ सेंटीमीटरपर्यंत असू शकते. याला ३८ दात तर ५० ग्रॅम वजन असणाऱ्या या वटवाघुळाचा वावर केळाची झाडे, गुहा, सुकी वने, झोपड्यांच्या कोपऱ्यावर अशा भागात आढळतो. तर छोटे किडे हे त्याचे प्रमुख अन्न आहे. या वटवाघळाची जोडी एका वेळी एकच पिल्लाचा सांभाळ करू शकते. ही वटवाघळे ५ ते ६ च्या समूहाने राहतात.

हे वटवाघूळ व त्याचा रंग पाहता सरफराज यांनी हे वटवाघूळ बरणीच्या साहाय्याने पकडून त्यांनी ते वटवाघूळ येथील वन विभागाच्या कार्यालयामध्ये नेऊन दिले. यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक लहू राऊत, वनरक्षक रमेश गडदे तसेच वनकर्मचाऱ्यांनी या दुर्मिळ वटवाघळास नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.