कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील तांबवे येथील कोयना नदीवरील पुलावरून ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरच्या पाठीमागील दुसऱ्या ट्रॉलीची पिन निसटल्याने ट्रॉली ऊसासकट नदीपात्रात कोसळल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटना स्थळावरून मिळालेल्या मिळालेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील तांबवे येथून ऊसाच्या दोन ट्रॉली घेऊन एका ट्रॅक्टर राजारामबापू सहकारी साखर कारखान्याकडे शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास निघाला होता. ट्रॅक्टरला पाठीमागील बाजूस दोन ऊसाने भरलेल्या ट्रॉली जोडलेल्या होत्या. ट्रॅक्टर कोयना नदीवरील पुलावरून निघाला असता पुल ओलांडत असताना पुलाच्या चढाला ट्रॅक्टरच्या पाठीमागील दुसऱ्या शेवटच्या क्रमांकाची ट्रॉलीची पिन ही पुढील ट्रॉलीपासून निसटली.
त्यामुळे ट्रॉली तशीच पाठीमागे उतराने कोयना नदीवरील पुलाच्या संरक्षक लोखंडी अँगलला जाऊन धडकली. लोखंडी अँगल कमकुवत असल्याने ते तोडून ट्रॉली ऊसासकट नदीपात्रात कोसळली. ही गोष्ट ट्रॅक्टर चालकाच्या पुढे गेल्यानंतर लक्षात आल्याने त्याने ट्रॅक्टर रस्त्याकडेला थांबवून याबाबतची माहिती संबंधित माहिती शेतकरी व ट्रॅक्टर मालकास दिली.
या घटनेनंतर तांबवे येथून जाणाऱ्या ग्रामस्थ व नागरिकांनी कोयना नदीवरील पुलावरून खाली पडलेली ट्रॉली बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.