सातारा-कोल्हापूर डेमो रेल्वेच्या वेळापत्रकात बदल; 1 जानेवारीपासून ‘या’ वेळेत सुटणार

0
6
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातून रेल्वेने प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्यास दिवशी म्हणजे १ जानेवारीपासून सातारा-कोल्हापूर डेमो रेल्वे नवीन नंबरसह नवीन वेळेत धावणार आहेत. या रेल्वेचा क्रमांक ७१४२३ असा असणारा असून ही रेल्वे साताऱ्याहून पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी सुटेल. साताऱ्यातून कराड येथे सकाळी ६ वाजून २५ मिनिटांनी तर किर्लोस्करवाडी येथे सकाळी ७ वाजता ही रेल्वे पोहोचेल. मिरज जंक्शन येथे सकाळी ८ वाजून ८ मिनिटांनी पोहोचून ८ वाजून १० मिनिटांनी सुटेल. कोल्हापूर येथे ही रेल्वेगाडी सकाळी साडेनऊ वाजता पोहचणार आहे.

मध्य रेल्वे, पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्यांच्या वतीने रेल्वेच्या वेळ बदलाबाबत अनेकवेळा रेल्वे प्रशासनासोबत देखील चर्चा करण्यात आली होती. त्यानुसार प्रवाशांनी वेळापत्रकामध्ये झालेला बदलबाबत मध्य रेल्वे, पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी (कोल्हापूर), किशोर भोरावत (मिरज), गोपाल तिवारी (कराड) व ॲड. विनित पाटील (सातारा), रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शनचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे व उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी प्रयत्न केले आहे.

सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना जास्त फायदा : गोपाल तिवारी

कोल्हापूर स्थानकातून जाणाऱ्या व येणाऱ्या सात एक्स्प्रेससह चार पॅसेंजर रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील प्रवाशांच्या दृष्टीने फायद्याची असणाऱ्या सातारा कोल्हापूर डेमो रेल्वेच्या वेळापत्रकात १ जानेवारीपासून बदल करत त्याची अंलबजावणी केली जाणार आहे. याचा जास्त करून फायदा विद्यार्थी आणि किर्लोस्करवाडी येथे कामानिमित्त जाणाऱ्या नोकरदार वर्गाला होणार असल्याची प्रतिक्रिया पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य गोपाल तिवारी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.

सातारा-कोल्हापूर पॅसेंजरच्या वेळबदलाबाबत सातत्याने मागणी

सातारा-कोल्हापूर पॅसेंजर पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी साताऱ्यातून सुटते. ती सकाळी साडेनऊ वाजता कोल्हापूर स्थानकात पोहोचते. या गाडीने येणाऱ्या प्रवाशांत शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. या कर्मचाऱ्यांना सकाळी पावणेदहा वाजेपर्यंत कार्यालयात पोहोचणे आवश्यक असल्याने ही गाडी गैरसोयीची ठरत होती. यामुळे या गाडीची वेळ बदलावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती.

7 एक्स्प्रेससह 4 पॅसेंजर रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल

कोल्हापूर स्थानकातून जाणाऱ्या व येणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेस, महाराष्ट्र, कोयना, हरिप्रिया, कोल्हापूर- अहमदाबाद, कोल्हापूर-हजरत निझामुद्दीन व कोल्हापूर-कलबुर्गी या सात एक्स्प्रेससह चार पॅसेंजर रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. एक जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

कोल्हापुर – मुंबई कोयना एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल

कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या कोयना एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. सकाळी आठ वाजून 15 मिनिटांऐवजी ती आता सकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी सुटणार आहे. कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस रात्री 8 वाजून 50 मिनिटांऐवजी 8 वाजून 55 मिनिटांनी सुटणार आहे. कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेसही सकाळी 11 वाजून 40 मिनिटांऐवजी 11 वाजून 50 मिनिटांनी सुटेल. कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस दुपारी 2 वाजून 45 मिनिटांऐवजी 2 वाजून 50 मिनिटांनी तर कोल्हापूर-कलबुर्गी दुपारी तीन ऐवजी 3 वाजून 5 मिनिटांनी सुटणार आहे. कोल्हापूर-हजरत निझामुद्दीन एक्स्प्रेस दर मंगळवारी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांऐवजी 9 वाजून 35 मिनिटांनी सुटणार आहे.

तिरुपती-कोल्हापूर हरिप्रिया एक्स्प्रेस ‘या’ वेळेस सुटणार

कोल्हापूर-अहमदाबाद दर शनिवारी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांऐवजी 1 वाजून 30 मिनिटांनी सुटणार आहे. गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस दुपारी 12 वाजून 25 मिनिटांऐवजी कोल्हापूर स्थानकात 11 वाजून 25 मिनिटांनी येईल. तिरुपती-कोल्हापूर हरिप्रिया एक्स्प्रेस दुपारी 4 वाजून 45 मिनिटांऐवजी 4 वाजून 35 मिनिटांनी येईल. मुंबई- कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस रात्री 8 वाजून 15 मिनिटांऐवजी 8 वाजून 25 मिनिटांनी येणार आहे.

कोल्हापूर-पुणे डेमूची अशी असणार सुटण्याची वेळ

कोल्हापूर-पुणे डेमू सकाळी पाच ऐवजी 5 वाजून 10 मिनिटांनी सुटेल. पुण्यात दुपारी दीड ऐवजी एक वाजता पोहोचेल. कोल्हापूर-मिरज सकाळी 10.30 ऐवजी 10.25 ला सुटेल आणि मिरजेत 11.40 ऐवजी 11.35 ला पोहोचेल. कोल्हापूर-सांगली सायंकाळी 6.40 ऐवजी 6.35 ला सुटणार असून मिरजेत 8.20 ऐवजी 8.15 वाजता पोहोचणार आहे. पुणे-कोल्हापूर रात्री साडेसातऐवजी 7 वाजून 35 मिनिटांनी पोहोचणार आहे. मिरज-कोल्हापूर मिरजेतून 2.40 ऐवजी दुपारी 2.35 वाजता सुटणार असून दुपारी 3.45 ऐवजी 3.50 वाजता कोल्हापुरात पोहोचणार आहे.