सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वरचे थंड वातावरण, इथली माती स्ट्रॉबेरीसाठी पोषक आहे. त्यामुळे प्रथम ब्रिटिशांनी इथल्या मातीत स्ट्रॉबेरीची लागवड केली. आता या ठिकाणी स्ट्रॉबेरीच्या विविध जाती आता विकसित झाल्या असून, महाबळेश्वरच्या मातीत एक-दोन नव्हे तर १४ जातीच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली जात आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्यांना १४ प्रकारच्या स्ट्रॉबेरीची चव चाखता येणार आहे.
पूर्वी तालुक्यात स्ट्रॉबेरीच्या एक-दोन जातींची लागवड केली जात होती. मात्र, दहा वर्षांत स्ट्रॉबेरीच्या विविध जाती विकसित झाल्याने शेतकऱ्यांकडून काही जातींची प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्यात आली. प्रयाेग यशस्वी झाल्याने आता विविध १४ प्रकारच्या स्ट्रॉबेरीची शेतकरी लागवड करू लागले आहेत. महाबळेश्वर तालुक्यात २० टक्के विंटर डाऊन तर ८० टक्के अन्य जातीच्या रोपांची लागवड केली जाते.
विंटर डाऊन या रोपांना लवकर फळे लागतात. ती गोडीला कमी असतात. त्यामुळे महाबळेश्वर वगळता अन्य ठिकाणी ८० टक्के शेतकरी या जातीची लागवड करतात.
२ हजार शेतकऱ्यांकडून घेतले जाते उत्पादन
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरीचे क्षेत्र हळूहळू वाढू लागले आहे. यंदा २ हजार ३०० शेतकऱ्यांकडून २ हजार ८०० एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड करण्यात आली आहे.
‘या’ चौदा प्रकारच्या आहेत जाती…
विंटर डाऊन, एलियाना, फोर्च्युना, ब्रिलियन्स, ब्युटी, पल्मारिटा, पार्थियॉन, स्वीट सेन्सेशन, कॅमाराेजा, मिलिसा, मिलिसॉल, स्पेन एन्ड्रियल, विवारा, मुरानो अशा चौदा प्रकारच्या जाती महाबळेश्वरात स्ट्रॉबेरीच्या आहेत.