येळगावातील अल्पभूधारक शेतकऱ्याने आपली सव्वादोन गुंठे शेतजमीन केली दान

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा मनाने किती मोठा असू शकतो याचे उदाहरण तालुक्यातील येळगाव येथील अल्पभूधारक शेतकरी संभाजी बाळकृष्ण कारंडे यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला आहे. गावातील तलाठी व मंडलाधिकारी कार्यालयास आपली रोडटच सव्वादोन गुंठे शेत जमीन दान करून समाजासमोर एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे.

ग्रामीण भागात शासकीय कार्यालये असतील तर गावकऱ्यांची धावपळ होत नाही. मात्र जागेअभावी योग्य ठिकाणी ती बांधता येत नाहीत. अशावेळी गावकऱ्यांचं हित पाहता जमीन दान देऊन पुण्याचे काम करावे असा सहज शब्द कारंडे यांना महसूल सेवक रमेश वसंतराव पाटील यांनी टाकला. क्षणाचाही विलंबन न लावता कारंडे यांनी होकार दिला. त्यानंतर महसूल सेवक संघटनेचे माजी अध्यक्ष विकास ठोंबरे यांना ही बाब दोघांनी सांगितली.

ठोंबरे यांनी हा स्वागतार्ह निर्णय कराडचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अतुल म्हेत्रे  व तहसीलदार कल्पना ढवळे यांना कळविला. तत्काळ संबंधित शेतकऱ्याला तहसीलदार कचेरीत बोलवून त्यांचा जाहीर सत्कारही घडवून आणला. या सत्काराला उत्तर म्हणून शेतकऱ्याने तत्क्षणी संबंधित जमिनीचा  रितसर दस्तावेज तलाठी व मंडलाधिकारी कार्यालय येळगाव तर्फे तहसीलदार कराड यांचे नावे करून दिला.

या शेतकऱ्याने जमिनीच्या बदल्यात मिळणारी रक्कम सुद्धा नाकारली. यावेळी नायब तहसीलदार हेमंत बेसके, युवराज पाटील, निवासी नायब तहसीलदार बाबुराव राठोड, प्रांत ऑफिसचे क्लार्क प्रवीण साळुंखे व येळगाव सर्कल मधील सर्व तलाठी उपस्थित होते. सामाजिक भावनेने सर्वसामान्य कुटुंबातील एका शेतकऱ्याने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून कारंडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अधिकारीही भारावून गेले

या शेतकऱ्याचा अल्प शेतीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. बकरी चारणे हा त्यांचा दुय्यम व्यवसाय आहे.  त्यांना मुलगा नाही, मात्र इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेल्या आपल्या एकुलत्या एक मुलीलाच आपला मुलगा समजून ते तिच्यासाठी अहोरात्र कष्ट उपसत आहेत. या शेतकऱ्याने  आपला निर्णय  तालुका प्रशासनाला कळविताच प्रशासकीय अधिकारीही अक्षरशः भारावून गेले. या दानशूर व्यक्तीचा इतरांनीही आदर्श घ्यावा अशा भावना यावेळी प्रांत अतुल म्हेत्रे व तहसीलदार कल्पना ढवळे यांनी व्यक्त केल्या.

बांध टोकारणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन…

टीचभर काकोरीसाठी व दुसऱ्याच्या हद्दीत शिरकाव करण्याच्या हेतूने बांध टोकारणाऱ्यांच्या डोळ्यात कारंडे यांनी आपल्या कृतीने आदर्श ठेवत झणझणीत अंजन घातले आहे