लाच मागणी प्रकरण : सहायक फौजदारासह दोघांना न्यायालयीन कोठडी

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | फसवणुकीच्या गुन्ह्यातील संशयिताला जामीन मिळवून देण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणीच्या गुन्ह्यात मुंबई पोलिस दलातील सहायक फौजदारासह दोघे सोमवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांच्यासमोर स्वत:हून हजर झाले. त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

आनंद मोहन खरात (रा. दहिवडी, ता. माण) व किशोर संभाजी खरात (रा. सांगली, सध्या मुंबई) अशी हजर झालेल्यांची नावे आहेत. यातील किशोर खरात हा मुंबई पोलिस दलात सहायक फौजदार या पदावर कार्यरत आहे. याबाबत एका युवतीने तक्रार दिली आहे. याबाबत पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

त्यात त्यांना अटक करण्यात आली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. जामीन मिळण्यासाठी त्यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केलेला आहे. तो तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे. तो जामीन अर्ज मंजूर करण्यासाठी किशोर व आनंद यांनी न्यायाधीश निकम यांच्या सांगण्यानुसार महिलेकडे पाच लाख रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायाधीश निकम यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश जोशी यांनी हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान, या गुन्ह्यामधील दोघे संशयित आनंद व किशोर हे दोघे सोमवारी दुपारी स्वत:हून जिल्हा न्यायालयात हजर झाले.

ॲड. अनिकेत चव्हाण व आशिष बुधावले यांनी त्यांना न्यायालयासमोर हजर केले. दरम्यान, तपासी अधिकारी पुण्याला असल्यामुळे दोघांना सोमवारी ताब्यात घेता येणार नाही, असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे केला. त्यानंतर दोघांना न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी विनंती वकिलांनी न्यायालयाला केली. त्यानुसार दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तपासी अधिकारी उद्या (मंगळवार) दोघांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.