मंत्रिपदाची शपथ घेतलीय…आता सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रिपद कोणाला?

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यातून काँग्रेस आणि शरद पवारांचा बालेकिल्ला महायुतीने हद्दपारकरत ८ विधानसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व मतदारसंघात महायुतीने आपला विजयी झेंडा फडकवला. साताऱ्यात भाजपचे ४, शिवसेना शिंदे गटाचे २ आणि अजित पवार गटाचे २ आमदार निवडून आले. निवडणुकीत यश मिळवलेल्या आठ पैकी चार आमदारांनी काल कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ देखील घेतली. पवारांचा बालेकिल्ला हादरविणाऱ्या या चार शिलेदारांच्या खांद्यावर लवकर राज्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार आहे. मात्र, जिल्ह्यात सुरु आहे ती पालकमंत्रीपदाची चर्चा.. होय जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कुणाला दिलं जाणार हे पाहावं लागणार आहे.

काल रविवारी नागपुरात मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा थाटात पार पडला. तब्बल ३९ जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळेस पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यास मंत्रिपदाची चांगलीच लॉटरी लागली आहे. जिल्ह्यातून आ. शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), आ. शिवेंद्रराजे भोसले (Shivendrasinh Bhonsle), आ. मकरंद पाटील (Makrand Patil), आ. जयकुमार गोरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलीय.

शिवेंद्रराजेंच्या रूपाने राजघराण्यात तिसऱ्यांदा ‘लाल दिवा’

भाजपातून साताऱ्यातून राजघराण्याचे वारसदार आणि सलग पाचव्यांदा राज्यात प्रथम क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून गेलेले शिवेंद्रराजे भोसले यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सातारा जिल्ह्यातील राजघराण्यातून सर्वात पहिल्यांदा दिवंगत अभयसिंहराजे भोसले हे राजकारणात सक्रिय होते. त्यांनी विधिमंडळात साताऱ्याचे बराच काळ नेतृत्व केले. कॅबिनेट मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्रिपदही त्यांनी सांभाळले होते. त्यानंतर सेना-भाजपा युती सरकारच्या काळात उदयनराजे भोसले महसूल राज्यमंत्री होते. आता शिवेंद्रराजे भोसले यांच्या रूपाने राजघराण्यातील तिसरी व्यक्ती मंत्री होत आहे.

अजितदादांनी शब्द पाळला, मोठा कॅबिनेटमंत्री तर लहान भाऊ खासदार

वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील यांनि देखील काल कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलीय. खुद्द अजित पवार यांनीच मकरंद पाटलांच्या मंत्रिपदाबाबत थेट संकेत दिले होते. कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आलेल्या अजित पवारांना विचारण्यात आलं होतं कि, सातारा जिल्ह्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रिपदाची संधी आहे का? त्यावेळी अजित पवार यांनी ‘हो आहे,’ अशा शब्दांत साताऱ्याला मंत्रिपदाबाबतचा शब्द जाहीरपणे दिला . आणि तो शब्द त्यांनी पाळला देखील. त्यामुळे वाईत मोठा भाऊ कॅबिनेट आणि लहान भाऊ खासदार झाला आहे. वाई विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत प्रतापराव भोसले, राष्ट्रवादीचे मदनराव पिसाळ यांनी मंत्री म्हणून काम पाहिलं होतं. त्यानंतर आजपर्यंत वाई तालुक्याला मंत्रिपदानं हुलकावणी दिली होती. मागील तीन टर्म आमदार असणाऱ्या राष्ट्रवादीच्या मकरंद पाटलांनी सलग चौथ्यांदा विजय मिळविला. राज्यसभेचा राजीनामा देऊन उदयनराजेंनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यांच्या रिक्त जागी अजित पवार यांनी आमदार मकरंद पाटलांचे बंधू नितीन पाटील यांना राज्यसभेवर पाठवलं. आता मकरंद पाटलांना मंत्रिपद देऊन अजित पवार यांनी वाईकरांची मने जिंकली आहेत.

पाटणच्या शंभूराजेंना देखील पुन्हा कॅबिनेटमंत्रीपद

सातारा जिल्ह्यात फिक्स मंत्रिपद मिळणार असं छातीठोकपणे सांगितलं गेलं आणि मिळालं देखील ते आमदार म्हणजे शंभूराज देसाई होय. पाटण विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत त्यांनी आमदारकीची हॅट्रिक मारलीय. शंभूराज देसाई हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जातात. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृह आणि अर्थ राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती, तर त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात राज्य उत्पादन मंत्री म्हणून त्यांनी अडीच वर्ष काम केलं. संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव शंभूराज देसाईंच्या गाठीशी असलेल्या शंभूराज देसाई याणी देखील काल कॅबिनेट मंत्री म्हणून गोपनीयतेची शपथ घेतली. एकनाथ शिंदेंना कोणत्याही परिस्थितीत साथ देणारे आमदार अशी ओळख असलेल्या शंभूराज देसाई यांना आता कोणतं मंत्रिपद दिलं जातंय हे पहावं लागणार आहे.

जयकुमार गोरेंना कोणतं मंत्रिपद दिलं जाणार?

माण मतदार संघात विजयी चौकार मारणाऱ्या भाजप आमदार जयकुमार गोरे यांची फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एन्ट्री झाली आहे. त्यांनी देखील काल कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतलीय. २००९ पूर्वी अनेक वर्ष हा मतदारसंघ राखीव होता. मतदारसंघ खुला झाल्यानंतर एका पोटनिवडणुकीत आमदार जयकुमार गोरे हे पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर सलग तीनवेळा ते निवडून आले आहेत. गंभीर फौजदारी गुन्ह्यांमुळं आमदार गोरे हे नेहमीच वादग्रस्त राहिले आहेत. त्यामुळे आता जयकुमार गोरे यांना महत्वाच्या खात्यासह सोलापूरच्या पालकमंत्री वर्णी लागण्याची शक्यता आहे.