खा. उदयनराजे भोसलेंनी घेतली केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांची भेट; केली ‘ही’ महत्वाची मागणी

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील विकासाकरीता जास्तीत जास्त श्रमकार्य करण्याची जबाबदारी सरकार म्हणून आपली आहे. त्यामुळे आपल्या अखत्यारितील पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या माध्यमातुन कृष्णा नदी प्रदुषण मुक्त आणि जलपर्णी मुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी आज भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे केली.

केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भुपेंद्र यादव यांची खासदार उदयनराजे भोसले यांनी आज निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. काका धुमाळ, ॲड श्री. विनित पाटील उपस्थित होते. यावेळी खा. उदयनराजे यांनी मंत्री भुपेंद्र यादव यांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन जिल्हावासियांच्या वतीने अभिनंदन केले. यावेळी दोघांच्यात महत्वाच्या विषयावर चर्चा पार पडली.

कृष्णा नदीच्या पात्रात होणाऱ्या प्रदुषणाच्या बाबतीत सद्याची स्थिती चिंताजनक आहे. वाई, कराड, सातारा या मोठ्या शहरातील काही संस्था व सुजाण नागरिक यावर काम करत असून त्यास केंद्र शासनाच्या माध्यमातून “Trash Boom” किंवा “Waste Arresters” (वेस्ट अरेस्टरस्) सारख्या नविन तंत्रज्ञानाचा जोड दिल्यास, नदीपात्रातील प्लास्टिक कचरा निर्मुलन करण्यात यश येईल. यासाठी ज्या सामाजिक संस्था यामध्ये देशभरात चांगले कार्य करीत असतील त्यांना सामाजिक दायित्व निधी मधुन सातारा जिल्ह्यात कार्य करण्यास प्रोत्साहित करावे, संबंधीत संस्थांना स्वच्छता अभियान, जन जागृती चळवळ उभी करण्यासाठी केंद्राने पाउले उचलावीत, त्यासाठी स्थानिक पातळीवर लागेल ते सहकार्य आमच्या कडून होईल, नदी प्रदुषण रोखणे ही सामाजिक जबाबदारी सर्वांची आहे.

या जबाबदारीच्या भावनेतून कृष्णा नदीच्या प्रदुषणावर सविस्तर अभ्यास करण्यात यावा, वाई, कराड, सातारा या नगरपालिकांना प्रदुषण रोखण्यासाठी अधिकचा निधी देणेत यावा. जलपर्णी मुक्त कृष्णा नदी राहण्यासाठी उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, उपाययोजना राबविणेकामी क्षेत्र महाबळेश्वर येथे लवकरच राज्य व केंद्र सरकारच्या संबंधीत सर्व विभागांची आढावा बैठक बोलवण्यात येईल. क्षेत्र महाबळेश्वर मधील उगम पावणाऱ्या सर्व नद्यांच्या प्रदुषणाबाबत, योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन मंत्री भुपेंद्र यादव यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले.