सातारा प्रतिनिधी । महायुती सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या दि. १५ रोजी होणार असून भाजपचे दहा, शिंदेसेना आणि अजित पवार गटाचे चार ते पाच मंत्री असू शकतात. यामध्ये सातारा जिल्ह्यातून कोण शपथ घेणार याची उत्सुकता लागली असताना शिंदेसेनेच्या संभाव्य यादीत शंभुराज देसाई तर भाजपातून शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीमधून मकरंद पाटील यांचा समावेश आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवी दिल्लीत गेले असताना त्यांची साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली आहे. तर काल भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील मुंबईत फडणवीस यांची भेट घेतली असून मंत्रिपदाबाबत तर चर्चा झाली नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
महाराष्ट्र विधानसभेच हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 16 डिसेंबरपासून सुरु होत आहे. त्याआधी म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारासाठी उद्याचा दिवस आहे. दि.15 डिसेंबरला नागपूरच्या राजभवनात संध्याकाळी 4 वाजता मंत्री मंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. दरम्यान, या मंत्र्यांच्या शपथविधीआधीच इच्छुक आमदारांकडून मोठ्या प्रमाणात भेटीगाठी सुरु आहेत. भाजपसह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील इच्छुकांनी देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जात भेट घेतली आहे. तर शुक्रवारी रात्री उशिरा 1.30 वाजेपर्यंत अनेक इच्छुक आमदारांनी एकनाथ शिंदेंची देखील भेट घेतली. मंत्रिपद मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील देखील सांगर बंगल्यावर दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर सातारा येथील शिवेंद्रराजे भोसले, कोल्हापूरचे आमदार राहुल आवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार प्रकाश सोळंके, भाजपचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिंदे गटाचे संजय शिरसाठ, माजी मंत्री संजय राठोड, आमदार कुमार आयलानी, मनसे नेते राजू पाटील, आमदार संतोष दानवे, आमदार नमिता मुंदडा यांनी धाव घेतली आहे.
भाजपातून शिवेंद्रराजे की जयकुमार गोरे?
सातारा जिल्ह्यातून मंत्रिपदाच्या शर्यतीत शिवेंद्रराजे भोसले यांचे नाव पुढे आहे. त्याचबरोबर जयकुमार गोरे यांच्या नावाचीही चर्चा आहे. शिवेंद्रराजे भोसले यांची ही पाचवी टर्म आहे. बेरजेचे राजकारण करणाऱ्या शिवेंद्रराजे भोसले यांच्या मंत्रिपदासाठी इतर आमदारही अनुकूल आहेत. दुसरीकडे आगामी पक्षवाढीसाठी जिल्हा पिंजून काढण्याची क्षमता जयकुमार गोरे यांच्यात आहे. शिवाय माढा मतदारसंघ व पर्यायाने सोलापूर जिल्ह्यात मोहिते-पाटील यांच्या वर्चस्वाला हादरा देण्यासाठी गोरे भाजपासाठी उपयुक्त आहेत. त्यादृष्टीने गोरे यांचाही विचार होऊ शकतो.