कराड प्रतिनिधी । कराडमधील रविवार पेठेतील राधागोविंद कॉम्प्लेक्समधील शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेत दि.०१/०४/२०११ ते ३१/०३/२०२२ या कालावधीत खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे हेतु परस्पर नियमबाह्य कर्ज वाटप करण्यात आले आहे. पतसंस्थेतील संबंधितांनी पदाचा लाभ घेऊन ३५०० ते ४ हजार ठेवीदारांचा विश्वासघात करून सुमारे १३ कोटी हुन अधिक रुपयांचा अपहार झाला आहे. या प्रकरणी सर्व ठेवी संचालकांवर सहकारी संस्था फिरते पथकचे विशेष लेखापरिक्षण वर्ग २ श्री. धनंजय चंद्रकांत गाडे यांनी दि.१५/०४/२०२४ रोजी एफआयआर द्वारे गुन्हा दाखल केला. मात्र तेव्हापासून आजपर्यंत २४ संचालकांपैकी फक्त १० जणांना अटक झाली आहे. अजून १४ जणांना अटक करण्यात आली नाही. राज्याच्या गृहखात्याच्या निष्क्रीयतेमुळे व पोलीस अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दिरंगाईमुळे परिस्थिती गंभीर झाली. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणातील दोषीना तत्काळ अटक करावी यासाठी ठेवीदार कृती समिती एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील व सदस्य एन. के. मुल्ला यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे दिली.
कराड येथील ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील व सदस्य एन. के. मुल्ला यांनी आज कराड येथे पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ठेवीदार संघटनेचे सदस्य उदय हिंगमिरे, दिलीप हौसेराव-पाटील, डॉ. हिंमाशु शाह, सुनील महाजन, प्रा. भगवान खोत, तात्या शेटे, गौतम करपे, नीलकंठ राजमाने यांच्यासह महिला ठेवीदार उपस्थित होत्या. दिलीप पाटील म्हणाले की, कराड येथील राधागोविंद कॉम्प्लेक्स येथे १९९७-९८ सालापासून शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्था चांगल्या अर्थ स्थीतीत चालू होती. परंतु दि.०१/०४/२०११ ते ३१/०३/२०२२ या कालावधी दरम्यान संस्थेचे चेअरमन शरद मुंढेकर यांच्या नेतृत्वात सर्व संचालक व कर्मचारी वर्ग यांनी अत्यंत योजनाबध्द पध्दतीने खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे हेतु परस्पर नियमबाह्य कर्ज सदर कर्ज संचालक मंडळ व कर्मचारी याचेमध्ये वाटप केले.
आपल्या पदाचा लाभ घेवून ३५०० ते ४००० ठेवीदारांचा विश्वासघात केला व त्यांच्या सर्व ठेवी १३,९,९६,७२२ रुपये गिळंकृत केल्या. सर्व ठेवी संचालकांच्या घशात गेल्या यावर सहकारी संस्था फिरते पथक चे विशेष लेखापरिक्षण वर्ग २ श्री. धनंजय चंद्रकांत गाडे यांनी दि.१५/०४/२०२४ रोजी एफ आय. आर. क्र.५८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे तेव्हा पासून आजपर्यंत २४ संचालकांपैकी फक्त १० जणांना अटक झाली आहे. अजून १४ आरोपी निधड्या छातीने शहरात वावरत आहेत.
यामध्ये गोरगरीब ठेवीदारांना विश्वासाने ठेवलेल्या पैशाचा संचालक मंडळ व कर्मचारी यांनी संगनमत करून पैशाचा अपहार केल्यामुळे ठेवीदारांना त्यांच्या अडचणीच्या वेळी पैसे मिळाले नाहीत. बऱ्याच ठेवीदाराचे पैसे नसल्यामुळे उपचाराविना मृत्यू झाला आहे. ज्या ठेवीदाराचे मृत्यू झाले आहेत त्याला जबाबदार कोण? ज्या ठेवीदारांच्या पैशाचा अपहार करून संचालक मंडळ व कर्मचारी यांनी स्वतः प्रॉपर्टी खरेदी करून त्या नातेवाईकांच्या नावे व स्वतःचे नावावर असणाऱ्या प्रॉप्रर्टी हस्तांतरीत केलेल्या आहेत. सदर प्रॉपर्टी विक्री व खरेदी करणारे या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात यावा.
बहुसंख्य ठेवीदार हे ६० ते ८० वर्षे वयाचे आहेत. त्यापैकी बरेच शुगर, ब्लडप्रेशर व अन्य आजाराने ग्रस्त आहेत. यामध्ये गोर-गरीब महिला, व्यावसायिक सदस्य ठेवीदार आहेत. या सर्वांची कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. यास्तव सर्व ठेवीदार आंदोलन करत आहेत. यामध्ये राज्याच्या गृहखात्याला व पोलीसांना जाग यावी हा हेतू आहे व अफरातफरीमध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी व ठेवीदारांना न्याय मिळवून द्यावा अशी हजारो ठेवीदारांची आग्रहाची मागणी आहे. यासाठी नागरीकांनी मोठ्या संख्येने ठेवीदारांच्या पाठीशी उभे राहून या आंदोलनात सामिल व्हावे, अशी देखील मागणी सदस्य एन. के. मुल्ला यांनी केली.