कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली गावाच्या हद्दीत आज पहाटे पाच ते साडे पाच वाजण्याच्या सुमारास रेलवे प्रशासनाच्या वतीने मॉक ड्रिल घेण्यात आला. येथील रेल्वे गेट क्र. ९७ मधून अजमेर एक्सप्रेसला (Ajmer Express) ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली, असा संदेश गेटमनकडून कराड रेल्वे स्टेशनला देण्यात आला. यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांसह रेल्वे पोलीस व संबंधित यंत्रणेमध्ये एकच खळबळ उडाली. संबंधित त्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली परिसरा नजीक असलेल्या रेल्वे गेट नं. ९७ वर पहाटे साडेपाच वाजता मोठा आवाज झाला व पाठोपाठ रुग्णवाहिका आणि पोलीस गाडीच्या सायरनच्या आवाजाने स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान, पुण्याकडून मिरजकडे जाणाऱ्या अजमेर एक्सप्रेसला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक दिल्याची माहिती गेटमन नरेंद्र मीना यांनी कराड रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर अमरिश कुमार यांना दिली. यानंतर स्टेशन मास्तर यांनी ही माहिती रेल्वे सुरक्षा बल, रुग्णवाहिका व स्थानिक पोलीस प्रशासनाला देण्यात आली.
भीषण दुर्घटनेच्या घडलेल्या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन देखील खडबडून जागे झाले. व आर.पी.एफ, सिग्नल विभाग, टेलिकॉम, इंजिनिअरिंग, टी.आर.डी विभागातील अधिकारी गेट नं. ९७ वर तातडीने धाव घेतली आणि घटनास्थळी पाहणी करून मिळालेल्या माहितीची खातरजमा केली असता, प्रत्यक्ष अपघात झाला नसून अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक व अतिरिक्त विभागीय सुरक्षा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मॉक ड्रिल घेण्यात आल्याचे सर्वांच्या लक्षत आले.
अजमेर एक्सप्रेस पाऊण तास उशिरा धावली…
कराड नजीक कोपर्डे हवेली परिसरात प्रत्यक्ष घटना घडल्याचे भासवण्यासाठी व अधिकाऱ्यांना घटनेचे गांभीर्य लक्षात यावे, यासाठी पुण्यावरून मिरजकडे जाणारी अजमेर एक्सप्रेस माॅक ड्रील दरम्यान गेट नंबर ९७ वर जवळपास पाऊण तास थांबवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे या याठिकाणी मॉक ड्रीलच्या घटनेनंतर अजमेर एक्सप्रेस पाऊण तास उशिरा धावली.
घटनास्थळाचा परिसरातील स्थानिकांचा जीव टांगणीला
आज पहाटे पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली गावच्या परिसरातीळ रेल्वे गेट नंबर ९७ परिसरात फटाके वाजवून मोठा आवाज करण्यात आला होता व पाठोपाठ रुग्णवाहिका व पोलीस गाड्यांच्या आवाजाने नागरिकांची झोप उडाली. नक्की काय झाले? या ठिकाणी कसा काय अपघात झाला हे न समजल्याने स्थानिकांचा जीव टांगणीला लागला होता.