जिल्ह्यातील 1500 ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांना दिले जाणार मार्गदर्शन; 12 डिसेंबरपर्यंत आयोजन

0
3
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | ग्रामपंचायतींमार्फत विविध योजना व अभियानांची अंमलबजावणी करताना त्यामधील तरतुदींचे परिपूर्ण ज्ञान सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दीड हजार ग्रामपंचायतींच्या साडेचार हजार सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने आजपासून कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.

पहिल्या दिवशी कोरेगाव व जावळी तालुक्याची कार्यशाळा पार पडली. १२ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील विविध तालुक्यांची कार्यशाळा होणार आहे. जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायतींनी शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी या पंचायत राज संस्थांना बळकट करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १५०० ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासाठी एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात येत आहेत. आज मंगळवारी माण, खटाव तालुक्यात, बुधवारी कऱ्हाड, गुरुवारी महाबळेश्वर आणि वाई, ता. १० डिसेंबरला फलटण, खंडाळा, तर १२ डिसेंबरला पाटण तालुक्याची कार्यशाळा होणार आहे.

दरम्यान, विविध योजना व अभियानांमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच इतर मान्यवर यांच्या अनुभवांची देवाण-घेवाणही सुसंवादाद्वारे या कार्यशाळेत करण्यात येणार आहे.

या कार्यशाळेमध्ये आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजना, शाश्वत विकास ध्येये (एसडीजी), पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स व राष्ट्रीय पंचायत पुरस्कार, माझी वसुंधरा अभियान, हर घर जल, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, बिहार पॅटर्न वृक्ष लागवड, मोफत सूर्यघर योजना, ग्रामपंचायत करांची आकारणी, १५ वा वित्त आयोगातून करावयाची विविध विकासकामे, केंद्र व बाज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध अभियानांमध्ये जास्तीतजास्त ग्रामपंचायतींचा सहभाग व योजनांची नियोजनपूर्वक अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी दिली.