राजभवनात जाण्याऐवजी हे लोक शेतात पूजा-अर्चा करण्यासाठी का जातात?; काळजीवाहू मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता ठाकरेंचा निशाणा

0
2

सातारा प्रतिनिधी । आज पुण्यात समाजसेवक बाबा आढाव यांच्या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी गेलेल्या शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. “एवढं राक्षसी बहुमत असून देखील महाराष्ट्रात आनंद का नाही? बहुमत मिळून देखील राजभवनात जाण्याऐवजी हे लोक शेतात पूजा-अर्चा करण्यासाठी का जात आहेत. अमावस्येला पूजा अर्चा करण्यासाठी गेले, यावरुन त्यांची मानसिकता दिसून येते, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

पुण्यातील भिडे वाडा येथे गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले समाजसेवक बाबा आढाव यांचं उपोषण आज अखेर मागे घेण्यात आले. आज खा. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेऊन बाबा आढाव यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर, शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनीही त्यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, हरलेल्यांना आणि जिंकलेल्यांना देखील या निकालावर विश्वास नाही. वणवा पेटवायला एक ठिणगी पुरेशी असते, बाबा आढाव यांचं हे आंदोलन म्हणजे ती ठिणगी आहे. योजनांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र विकत घेतला. या घोळात एक मोठा विषय ईव्हीएमचा आहे. माझे मत कोठे जाते हे समजायला हवे, शेवटच्या एका तासात 76 लाख मतं का वाढली?

आमचा हा जो महाराष्ट्र आहे ना तो लेचा पेचा नाही, आपला महाराष्ट्र देशाला दिशा देईल. महाविकास आघाडीतील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे आंदोलन पुढे नेतील. बाबा आढाव यांनी हे आंदोलन मागे घ्यावे, महाराष्ट्रात अशी आंदोलने सर्व ठिकाणी होतील, असेही ठाकरेंनी यावेळी म्हटले.

काळजीवाहू मुख्यमंत्री पडले आजारी

काल महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरे गावी दाखल झाले. आज त्यांची तब्येत अचानक बिघडली असून त्यांना 105 डिग्री सेल्सिअस ताप आलेला आहे. त्यामुळे आजच्या सर्वांच्या भेटी रद्द करत ते आराम घेत असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.