सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीवेळापूर्वीच महाबळेश्वर तालुक्यातील आपल्या मूळगावी दरे येथे दाखल झाले. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला भरघोस मताधिक्य मिळाल्यानंतर ते प्रथमच गावी परतल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम गावातील श्री उत्तेश्वर देवस्थानला जाऊन श्रीचे दर्शन घेतले. तसेच त्यांनी दरे ग्रामस्थांची भेट घेऊन घराकडे रवाना झाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी मात्र बोलण्यास नकार दर्शवला.
नवी दिल्ली येथे सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल रात्री केंद्रीयगृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर आज मुंबईत पुन्हा महायुतीची बैठक होणार होती. मात्र, हि बैठक अचानकपणे पुढे ढकलण्यात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवस आपल्या दरे गावी जाण्याचा नियोजित दौरा आखला. त्यानंतर ते काही वेळापूर्वी आपल्या दरे गावी दाखल झाले.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक दरे गावी दौऱ्यामुळे दरे परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी एकनाथ शिंदे हे दोन दिवस मुक्कामी थांबणार आहेत. त्यानंतर ते मुंबईला रवाना होणार आहेत.
काळजीवाहू मुख्यमंत्रीचं पडले काळजीत!
विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या काळजी वाहू मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून तत्कालीन काही महत्वाचे निर्णय देखील घेतले जात आहेत. दरम्यान, सध्या महायुतीमध्ये मुख्यमंत्री पद आणि निवडीवरून धुसफूस सुरु असून यावेळेस मुख्यमंत्री पद हे भाजपकडे जाणार आहे. त्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले शिंदे सध्या द्विधा मनस्थितीत आहेत. अशात त्यांच्या सततच्या प्रवासामुळे, दौऱ्यामुळे त्यांचा परिणाम हा त्यांच्या तब्बेतीवर जाणवत असल्याने त्यांची तब्बेत देखील काहीशी ठीक नसल्याचे बोलले जात असून ते आराम करण्यासाठी आपल्या दरे या गावी दोन दिवसासाठी आले आहेत. दरम्यान दरे गावी दाखल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळल्याने काळजीवाहू मुख्यमंत्रीच काळजीत असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.
दिल्लीत मुख्यमंत्री शिंदेंनी साधला संवाद
दिल्लीतील बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी सूचक व्यक्तव्य केले होते. अमित शाह यांच्याबरोबर अतिशय सकारात्मक बैठक झाल्याचे त्यांनी म्हटले. “मुंबईत भाजपाची बैठक होईल. त्यानंतर पुढील निर्णय होईल. दिल्लीतली आमची बैठक सकारात्मक झाली. अमित शाह, जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाली. माझी भूमिका मी जाहीर केली आहे. मी शिवसेना म्हणून महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. डेडलॉक संपला आहे. सगळे काही व्यवस्थित आहे. मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे, मी सगळ्यांची काळजी घेतो आहे” असे एकनाथ शिंदेंनी म्हटले होते.