सातारा प्रतिनिधी । सध्या महायुतीमध्ये मुख्यमंत्री निवडणुकीवरून चांगल्याच घडामोडी घडत असून सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीस काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. या बैठकीत अमित शाह यांनी विविध सूचना दिल्या. त्यानंतर आज मुंबईत पुन्हा महायुतीची बैठक होणार होती. मात्र अचानकपणे महायुतीची ही बैठक रद्द करण्यात आली आहे. महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याने एकनाथ शिंदे हे दरे येथील आपल्या मूळ गावी येणार असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे.
महायुतीची आज होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस या तिनही नेत्यांची आज मुंबईत बैठक होणार होती. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांचे मूळगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भाजपा गटनेता निवड झाल्यानंतर महायुतीची बैठक होणार आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपने देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये काम करण्यास सांगितले होते. आता देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री पद दिले जाणार आहे.
दिल्लीतील बैठकीनंतर एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
दिल्लीतील बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी सूचक व्यक्तव्य केले होते. अमित शाह यांच्याबरोबर अतिशय सकारात्मक बैठक झाल्याचे त्यांनी म्हटले. “मुंबईत भाजपाची बैठक होईल. त्यानंतर पुढील निर्णय होईल. दिल्लीतली आमची बैठक सकारात्मक झाली. अमित शाह, जेपी नड्डा यांच्याशी चर्चा झाली. माझी भूमिका मी जाहीर केली आहे. मी शिवसेना म्हणून महायुतीच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. डेडलॉक संपला आहे. सगळे काही व्यवस्थित आहे. मी काळजीवाहू मुख्यमंत्री आहे, मी सगळ्यांची काळजी घेतो आहे” असे एकनाथ शिंदेंनी म्हटले होते.