साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात सौर ऊर्जेचा होणार झगमगाट

0
2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यातील ऐतिहासिक अशा शस्त्रांचा साठा असणारे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात लवकरच ५० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. या कामास येत्या काही दिवसात सुरुवात होणार असून प्रकल्पामुळे संग्रहालय ‘सौर’ ऊर्जेने उजळणार आहे. तसेच वीजबिलात मासिक सुमारे एक लाख रुपयांची बचतही होणार आहे.

केंद्र व राज्य शासनाने पारंपरिक ऊर्जा साधनांचा कमीत कमी वापर करुन अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर वाढविण्यासाठी नवनव्या योजना सुरू केल्या आहेत. याच धर्तीवर संग्रहालयाच्या छतावर ५० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. पुरातत्व विभागाने या प्रकल्पाला मंजुरी दिली असून, ३३ लाख १८ लाखांची तरतूदही केली आहे. संग्रहालयाच्या छतावर पुरेशी जागा उपलब्ध असून, येथे हा प्रकल्प उभारला जाणार आहे.

एक किलोवॅट सौर प्रकल्पातून महिन्याला १२० युनिट वीज तयार होते. त्यानुसार ५० किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून महिन्याला ६ हजार युनिट वीज तयार होणार आहे. सध्या संग्रहालयातील वाघनखांसह तख्त, शस्त्र, नाणी ही दालने इतिहासप्रेमींना पाहता येत आहे. नवीन वर्षांत हे संग्रहालय पूर्णपणे सुरू होणार असल्याने विजेची गरजही वाढणार आहे. त्यामुळे संग्रहालयाला हा प्रकल्प लाभदायी ठरणार आहे.

महिन्याला लाखाचे बिल संग्रहालयातील वाघ नखांसह अन्य दालने सुरू झाल्यापासून वीज वापर वाढला आहे. सध्या संग्रहालयाला मासिक ९० हजार ते १ लाख रुपये इतके वीज बिल येत आहे. सौरऊर्जा प्रकल्पामुळे हे बिल शून्य होणार असून, बीज बिलापोटी वार्षिक सुमारे १२ लाख रुपयांची बचतही होणार आहे.