सातारा प्रतिनिधी । सरकारी नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या सेवानिवृत्तीनंतर एका विशिष्ट रकमेची पेन्शन मिळत असते. सध्या पेन्शनधारकांसाठी हा महिना खूप महत्त्वाचा आहे. कारण या महिन्यांमध्ये पेन्शन घेणाऱ्या लोकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट जमा करायचे आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपण जिवंत असल्याचा पुरावा देण्यासाठी शासनाकडून १ ते ३० नोव्हेंबर अशी मुदत देण्यात आली आहे. या कालवधीत हयातीचा दाखला काढून तो बँकांमध्ये जमा न केल्यास डिसेंबर महिन्यात मिळणारी पेन्शन बंद होऊ शकते.
सातारा जसा शूरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, तसाच पेन्शनरांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. केंद्र व राज्य शासनाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात आपला हयातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) सादर करावा लागतो. हा दाखला सादर न केल्यास त्यांना पेन्शनपासून मुकावे लागते. हा दाखला सादर करण्यासाठी शासनाकडून ३० नोव्हेंबरची डेडलाइन देण्यात आल्याने शरीर थकले असले तरी अनेक सेवानिवृत्तांची दाखला काढण्याची लगबग सरू झाली आहे.
या वयात ही कसरत कशी करायची?
हयातीचा दाखला बँकांत सादर केल्याशिवाय त्या व्यक्तीला पेन्शन मिळत नाही. अनेक पेन्शनधारक अंथरुणाला खिळून आहेत. अशा व्यक्तींना स्वतः बँकेत जाऊन हा दाखला देणे अशक्य असते. या वयात – दाखल्यासाठी कसरत करायची कशी? असा प्रश्न अनेक पेन्शनरांना पडला आहे.
हयात असल्याचा दाखला कुठे मिळणार?
पेन्शनधारकांना आपल्या हयातीचा दाखला महा ई सेवा केंद्रात मिळू शकतो. याशिवाय पोस्टातूनही हा दाखला मिळवता येतो. पोस्टात प्रथम अर्ज करावा लगतो. यानंतर आधार कार्डची प्रत व अंगठ्याचा ठसा द्यावा लागतो. निर्धारित शुल्क जमा केल्यानंतर पोस्टमनकडून हयातीचा दाखला त्यांच्या पत्त्यावर पोहोच करतो.
पुरावा सादर करण्याची कसरत वेगळीच
- वयोमानानुसार ज्येष्ठांच्या हाचलाची मंदावतात. शिवाय बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करताना अंगठ्यांचे ठसे जुळत नाहीत.
- बऱ्याचदा आधार कार्डवरील तपशीलही वेगळा असतो. त्यामुळे हयातीचा दाखला मिळवताना त्यांना बरचे हेलपाटे मारावे लागतात.
यासाठी दाखला गरजेचाच
- प्रत्येक जीवन प्रमाणचा युनिक आयडी असतो. ज्यास प्रमाण आयडी असेही म्हटले जाते. हयातीचा दाखला सादर करण्याआधी पेन्शनधारक जिवंत आहे हे सुनिश्चित करावे लागते.
- पेन्शनधारक हयात असून, त्याला मिळणारा लाभ पुढेही सुरू राहावा, यासाठी हयातीचा दाखला मिळवणे गरजेचे असते.