कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात सकाळी सात वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीसाठी मतदानास सुरुवात झाली. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात सर्वात महत्वाची ठरलेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी पत्नी सौ. गौरवी भोसले व कुटुंबासह रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील पवार मळा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा पवित्र हक्क बजावला. तर साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी देखील कुटूंबासह आपला मतदानाचा हक्क बजावला.
आज सकाळी ठीक साडेसात वाजता कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले आपल्या कुटुंबासह मतदान केंद्रावर दाखल झाले. यावेळी त्यांनी यांच्यासह य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, सौ. उत्तरा भोसले आणि श्री. विनायक भोसले यांनीही या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तसेच फलटण विधानसभा मतदार संघात महायुतीचे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार सचिन सुधाकर पाटील यांनी फलटण येथील मुधोजी क्लब येथे सहकुटुंब येवून मतदान केले.
सातारा जिल्ह्यातील ८ मतदारसंघांत १०९ जण निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यात १३ लाख ३७ हजार ०७२ पुरुष तर १३ लाख ०५ हजार ६०८ महिला मतदार आहेत. तृतीयपंथीयांची संख्या ११४ आहे. असे २६ लाख ४२ हजार ७९४ मतदार बुधवारी (दि. २०) आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
मतदानानंतर डॉ. अतुलबाबा भोसलेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले कि, मला खात्री आहे…
मतदान केल्यानंतर डॉ. अतुलबाबा भोसले यांनी माध्यमांशी संवाद साधत पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, या निवडणुकीत जनतेला मला खूप मनापासून साथ दिली. खूप प्रेम दिले. या निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही सकारात्मक प्रचारावर भर देत, विकासकामांचे मुद्दे जनतेसमोर मांडले. भविष्यातील ५ वर्षांत या मतदारसंघाच्या विकासासाठी व लोकांच्या प्रगतीसाठी काय करता येईल, याबद्दलचे व्हिजन मी मतदारांसमोर मांडले. लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण, थोर विचारवंत स्व. यशवंतराव मोहिते आणि सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले आप्पांचा वैचारिक वारसा घेऊन आम्ही लोकांसमोर गेलो. त्यामुळे मला खात्री आहे, की यावेळी मतदारराजा मला आपल्या सेवेची संधी देणार आहे. मी मतदारसंघातील सर्व बंधू – भगिनींना आवाहन करतो, की जास्तीत जास्त मतदान करा. मतदानाचा पवित्र हक्क बजावा आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी योगदान द्या.
सकाळी नऊ वाजेपर्यंत या मतदार संघात झाले ‘इतले’ टक्के मतदान
सकाळी सात वाजल्यापासून न्यू वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात चांगले मतदान झाले. यामध्ये २५५ फलटण : 4.29, २५६ वाई : 4.92, २५७ कोरेगाव : 6.93, २५८ माण : 3.8, २५९ कराड उत्तर : 4.84, २६० कराड दक्षिण : 5.63, २६१ पाटण : 4.68, २६२ सातारा : 6.15