कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात महायुतीकडून भाजपचे डॉ. अतुल भोसले तर महाविकास आघाडी कडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवत आहेत. आरोप प्रत्यारोप यांनी कराड दक्षिण मतदार संघातील वातावरण चांगलेच तापले असताना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या कार्यकर्त्याकडून कराड तालुक्यातील कोळेवाडी येथे पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ रविवारी सोशल मिडीयामध्ये व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, या प्रकरणी निवडणूक विभागाकडून रात्री उशिरापर्यंत कराड तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे काम सुरू होते. अखेर या घटनेप्रकरणी पोलिसांत एका जणाविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील कोळेवाडी गावात रविवारी दुपारी आचार संहितेचे उलंघन केल्या प्रकरणी सुहास मनोहर पांरपटटे यांनी कराड तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून केतन विजय कदम (रा. रेठरे बू. ता. कराड) यांच्यावर अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून १ लाख १६ हजार ५०० रुपये मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
केतन विजय कदम (रा. रेठरे बु. ता. कराड जि. सातारा) हा निवडणुक कामासाठी पैसे वाटपासाठी घेऊन आलेला होता. तेव्हा ग्रामस्थांनी त्याच्याकडे विचारपुस केली आसता त्याचे जवळील रक्कम व मतदार यादी त्याने तेथेच टाकुन तेथुन पळुन गेलेला होता. त्यानंतर कोळेवाडीतील काही ग्रामस्थ रक्कम व काही कागद घेऊन तहसील कार्यालय येथील आचारसंहिता विभाग कक्ष येथे जमा केली.
दरम्यान, रविवारी रात्री उशिरा निवडणूक विभागाकडून सुहास मनोहर पांरपटटे यांनी कराड तालुका पोलिस ठाण्यात सदर व्यक्ती विरोधात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक फौजदार खाडे करत आहेत.