सातारा प्रतिनिधी | कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग (पीडब्लूडी) आणि ज्येष्ठ नागरिक (८५+) अशा एकूण २७२ पैकी २५६ मतदारांनी गृहभेट कार्यक्रमातून घरच्या घरी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. कोरेगाव विधानसभा मतदार संघातील दिव्यांग (पीडब्लूडी) व ज्येष्ठ नागरिक (८५+) मतदारांना सुलभतेने मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाचे निर्देश आणि सूचनेनुसार कोरेगाव मतदारसंघात १६ पथकांद्वारे आठ ते दहा नोव्हेंबर २०२४ या कालावधीत गृहभेटीद्वारे मतदान घेण्यात आले.
मतदारसंघातील या गृहभेट कार्यक्रमादरम्यान दिव्यांग (पीडब्लूडी) ३७ पैकी ३५ व ज्येष्ठ नागरिक (८५+) २३५ पैकी २२१ अशा एकूण २७२ पैकी २५६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क घरात बसून सुलभतेने बजावला.
दरम्यान, कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीदिवशी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी टपाली मतपत्रिका ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. येथे दोन टपाली मतदान सुविधा केंद्रे उभारली. या कालावधीत निवडणुकीच्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी टपाली मतदान सुविधा केंद्राचा लाभ घेतला, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी पत्रकाद्वारे सांगितले.