कराड प्रतिनिधी । सध्या विधानसभा निवडणुकीसाठी वरिष्ठ नेते ज्या ज्या ठिकाणी पक्षाचे उमेदवार उभे आहेत त्या ठिकी प्रचार सभांना हजेरी लावत आहेत. दरम्यान, महायुतीचे कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांच्या प्रचारार्थ मलकापूर, ता. कराड येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. उद्या शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता मलकापुरातील बैल बाजार रोडवरील श्री. गणपती मंदिरामागील भव्य पटांगणावर ही सभा होणार आहे.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. या निवडणुकीच्या प्रचारात भाजपा – महायुतीचे कराड दक्षिणचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी आघाडी घेत, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभांच्या माध्यमातून प्रचाराचे रान चांगलेच तापविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. नुकतीच विंग (ता. कराड) येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची अलोट गर्दीत जाहीर प्रचार सभा पार पडली. त्यानंतर आता मलकापूर (ता. कराड) येथे शुक्रवारी (ता. १५) सकाळी ११.३० वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेला जिल्ह्यातील भाजपा आणि महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेची मलकापुरातील भव्य पटांगणावर जय्यत तयारी सुरु असून, कार्यकर्त्यांनी व जनतेने मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष पैलवान धनंजय पाटीर यांनी केले आहे.