माण – खटाव मतदारसंघात ट्रम्पेट चिन्हावरून झाला वाद; उमेदवारावर गुन्हा दाखल

0
27
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | माण-खटाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता उमेदवार सत्यवान विजय ओंबासे (रा. वडगाव ता. माण) यांनी मतदारांवर गैरवाजवी प्रभाव पाडण्यासाठी डिजिटल फ्लेक्सवर ट्रम्पेट या चिन्हाच्या समोर कंसात तुतारी असे लिहून आणि स्पीकरवर ऑडिओ क्लिप प्रसारित केल्याने सदरच्या गाडीवर व उमेदवारावर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, माण-खटाव मतदारसंघात स्वराज्य सेनेचे उमेदवार सत्यवान ओंबासे यांना निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेट हे अधिकृत चिन्ह मिळाले आहे. मात्र, प्रचार करत असताना ट्रम्पेट कंसात तुतारी असा प्रचार करत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, तालुकाध्यक्ष दत्तुकाका घार्गे, सरचिटणीस सूर्यभान जाधव व कार्यकर्ते यांनी सदर प्रचाराची गाडी मांडवे हद्दीत पकडून वडूज पोलिस ठाण्यात आणली. संबंधितांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. याच संदर्भात वडूज पोलिस ठाण्यात उमेदवार सत्यवान ओंबासे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच वाहन क्रमांक ११ डीबी ५६१० वरदेखील गुन्हा दाखल झाला आहे.

सदर गुन्ह्याची नोंद वडूज पोलिस ठाण्यात झाल्या असून वाहनावरील आक्षेपार्ह साहित्य आणि स्पीकर जप्त केले आहे. तर सदर उमेदवारावर आचारसंहितेचा भंग म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रसाद वाघ करीत आहेत.