सातारा प्रतिनिधी | सातारा पालिकेच्या वतीने सातारा शहरातील स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. दरम्यान, सातारा शहर कचरामुक्त करण्यावर भर दिला असतानाच आता शहरातील रस्त्यांची यांत्रिक पद्धतीने स्वच्छता केली जाणार आहे. पालिकेच्या ताफ्यात नुकतेच नवीन स्वीपिंग वाहन दाखल झाले असून, रविवारी रात्री पोवई नाका परिसरातील रस्त्यांची या वाहनाद्वारे स्वच्छता करण्यात आली.
सातारा शहर पर्यावरणीयदृष्ट्वा संवेदनशील आहे; परंतु कोणत्या न कोणत्या कारणांनी होत असलेल्या प्रदूषणामुळे पर्यावरणाला धोका उद्भवू लागला आहे. हवेत वाढणारी धूलिकणांची पातळी हेदेखील प्रदूषणाचे एक मुख्य कारण आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेच्या ताफ्यात प्रथमच स्वीपिंग वाहन दाखल झाले आहे.
या वाहनाच्या खाली दोन्ही बाजूला दोन ब्रश असून, ते रस्ता स्वच्छतेचे काम करतात. मध्यभागी असलेल्या ब्रशमधील व्हॅक्यूम पाइपच्या माध्यमातून रस्त्यावरील धूळ व अन्य कचरा चार टन क्षमतेच्या कंटेनरमध्ये जमा केला जातो. रस्ता स्वच्छ केल्यानंतर रस्त्यावर पाण्याचा फवाराही मारला जातो. या कचऱ्याची कचरा डेपोत विल्हेवाट लावली जाते.
साताऱ्यात रात्रीच चालणार मशीनद्वारे काम
स्वीपिंग मशीन १० ते १२ किलोमीटर प्रती तास या वेगाने स्वच्छतेचे काम करते. दिवसा स्वच्छता करणे शक्य नसल्याने रात्रीच्या वेळी शहर धूळमुक्त करण्याचे पालिकेने नियोजन आहे. त्यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.




