सातारा प्रतिनिधी । देशात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI ) यांच्या कलम १६(३) अन्न सुरक्षा आणि प्राधिकरण कायदा २००६ नुसार अन्नर सुरक्षा प्रशिक्षण व प्रमाण (Fos Tac) या उपक्रमाची सुरुवात ३१ डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आली आहे. सदर उपक्रमात सातारा जिल्ह्यात अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे. यासाठी सातारा जिल्ह्यात अन्न सुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणन व्यवस्थापन अधिकारीपदी शंकर वेताळ तसेच सहाय्य्य जिल्हा अन्न सुरक्षा प्रशिक्षण व्यवस्थापन अधिकारी म्हणून धनाजी चव्हाण यांच्यासह ४० समन्वयक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती राज्य अन्न सुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणन व्यवस्थापण अधिकारी महेश भडके यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
सातारा जिल्ह्यात करण्यात आलेल्या नियुक्त्यासोबतच राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाविषयी महेश भडके पुढे म्हणाले की, अन्न सुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणन संस्थेच्या वतीने मागील 5 वर्ष पासुन देशात 500 पेक्षा अधिक प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आलेल्या आहेत. सदर प्रशिक्षण उपक्रमात तीन भागांची रचना करण्यात आली आहे. सामान्य वर्गामध्ये घरातील मेस पासुन ते लहान लहान आस्थापने, प्रगत वर्गात राज्य / केंद्र अन्न परवाने असणारे सर्व खाद्यपदार्थ आस्थापन व व्यावसायिक यांचा समावेश होतो. विशेष वर्गात मोठे खाद्यपदार्थ उद्योजक / कंपन्या यांचा समावेश करण्यात आला आहे.
यात घरगुती मेस, केटरिंग, ज्यूस व्यवसाय, तेल, मांस व अंडी / पोल्ट्री, दुग्ध व्यावसायिक, भाजून / तळून विकणारे खाद्यपदार्थ इत्यादी 23 प्रकार यात असुन या सर्वांनी सदर प्रशिक्षण घेणे बंधनकारक आहे. यात सदर परवाना / प्रमाणपत्र याची वैधता नवीन सूचना नुसार दोन वर्ष अशी असणार आहे. तसेच या उपक्रमाचा मुख्य उद्देश हा नागरिकांना उत्तम दर्जाचे अन्न व होणारी विषबाधा यापासुन त्यांचा बचाव करणे तसेच भेसळयुक्त खाद्यपदार्थपासून होणारी हानी टाळता यावी हा आहे.
सदर अन्न सुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणन हे ७ जिल्ह्यात सुरु करण्यात आले असुन लवकरच सर्व जिल्ह्यात सुरु करण्यात येत आहे. राज्यात जास्तीत जास्त अन्न सुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणन यासाठी सर्व जिल्हा व तालुका तसेच समन्वयक यांना सहकार्य करावे, असे आवाहन भडके यांनी केले आहे.