कराड प्रतिनिधी । कराड-तासगाव मार्गावर कार्वे नाका हद्दीत एका मालट्रकखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास घडली. शशिकांत प्रकाश माळी ( वय 55, रा. काले, ता. कराड असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात ठार झालेले शशिकांत माळी हे आत्माराम विद्यालय, ओगलेवाडी येथे शिक्षक होते.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड-कार्वे रस्त्यावर मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कार्वे बाजूकडून कराडच्या दिशेने एक माल ट्रक क्रमांक (WB 23 D 6347) जात होता. ट्रक कृषी उत्पन्न बाजार समिती गेट नंबर तीन जवळ आला. त्याचवेळी शशिकांत माळी आपल्या दुचाकीवरून कार्वे (ता. कराड) गावाकडे निघाले होते. यावेळी माळी यांची दुचाकी ट्रकच्याखाली आली. या अपघातात दुचाकीवरील शशिकांत माळी ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली. काहींनी ट्रकवर दगडफेक केली. या अपघातामुळे कराड-कार्वे रस्त्यावर काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच कराड शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक आबा जगदाळे, हवालदार महाले यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी अपघातात मृत्यू झालेल्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून कराड शहर पोलीस ठाण्याचा अपघात विभाग घटनेचा अधिक तपास करत आहे.




