सातारा प्रतिनिधी । सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील (एसटीआर) जैवविविधतेची गुंतागुंतीची टेपेस्ट्री उलगडण्याच्या वनविभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तीन टप्प्यांत फुलपाखरू सर्वेक्षण सुरू केले आहे. यात दोन सर्वेक्षणांच्या आकडेवारीवरून ९८ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.
सातारा (महाबळेश्वर, मेढा, सातारा आणि पाटण तहसील), सांगली (शिराळा तहसील), कोल्हापूर (शौवाडी), आणि रत्नागिरी (संगमेश्वर, चिपळूण आणि खेड तहसील) या चार जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात (एसटीआर) फुलपाखरे मोजण्याचा प्रयत्न महाराष्ट्र वन विभागाने प्रथमच केला.
हे सर्वेक्षण लोकसहभागातून करण्यात आल्याने सुमारे ४० जणांनी सर्वेक्षणात भाग घेतला. यात दोन दिवस १० ते १५ किमीची पदयात्रा काढण्यात आली आहे. सहभागींकडून डेटा संकलित करण्यात आला आहे आणि वन अधिकाऱ्यांनी त्याचे विश्लेषण केले आहे, असे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम. रामानुजम यांनी सांगितले.
‘या’ प्रजातींची नोंद
मलबार बँडेड पीकॉक, तमिळ लेसविंग आणि क्रिमसन रोज या दुर्मिळ प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. ब्लू मॉर्मन, मलबार बॅन्डेड पीकॉक, कॉमन मॅप ही फुलपाखरे सर्वाधिक आहेत, त्यानंतर चॉकलेट पॅन्सी, लेमन पॅन्सी, ब्लू पॅन्सी यांचा क्रमांक लागतो. या नवीन प्रजातींची नोंद आता झाली आहे.