शिंगणापूर यात्रेसाठी सातारा विभागातील 11 आगारातील 93 लालपरी सज्ज

0
330
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शिंगणापूर येथील शंभू महादेव यात्रेत भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या वतीने जादा एसटी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. शिंगणापूर यात्रेसाठी सातारा विभागातील 11 आगारांमार्फत 93 बसेसची तर सोलापूर विभागातील 9 आगारांमार्फत 89 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय पुणे, सांगली, मराठवाडा विभागामार्फतही जादा बसेसची सोय करण्यात आली आहे.

शिंगणापूर यात्रेसाठी भाविकांचा ओघ सुरु झाला असून भाविकांच्या सोयीसाठी लालपरी सज्ज झाली आहे. शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची यात्रा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. शिंगणापूर यात्रेसाठी मराठवाडा, विदर्भ, खानदेशातून येणार्‍या भाविकांची संख्या मोठी असते. यात्रेसाठी येणारे लाखो भाविक पंढरपूरमार्गे शिंगणापूरकडे एसटीने येत असतात. त्यामुळे यात्राकाळात शिंगणापूर-पंढरपूर मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी एसटीच्या सातारा व सोलापूर विभागामार्फत जादा एसटी वाहतुकीची सोय केली जाते. याशिवाय सांगली, पुणे, मराठवाडा, विदर्भ विभागातूनही भाविकांसाठी जादा बसगाड्या सोडण्यात येतात.

यावर्षीच्या शिंगणापूर यात्रेसाठी सातारा विभागाने जादा एसटी वाहतुकीचे नियोजन केले असून सातारा विभागातील 11 आगारांतून 93 बसेसचे नियोजन केले आहे. शिंगणापूर यात्रेसाठी 7 ते 10 एप्रिल कालावधीत शिंगणापूर-पंढरपूर जादा प्रवासी वाहतूक केली जाणार असून प्रवाशांची संख्या मागणीनुसार अन्य मार्गावरही जादा एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिंगणापूर यात्रेसाठी यात्राप्रमुख म्हणून दहिवडीचे आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात्रेसाठी 10 वाहतूक अधिकारी, 11 वाहतूक निरीक्षक, 11 वाहतूक नियंत्रक तसेच विशेष तपासणी पथक नियुक्ती करण्यात आली आहेत. भाविकांना दहिवडी, कराड, सातारा, सांगली, फलटण, पुणे या मार्गावर जाण्यासाठी शिंगणापूर येथील दहिवडी फलटण चौक याठिकाणी असलेल्या तात्पुरत्या बसस्थानकातून बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच म्हसवड, पंढरपूर या मार्गावर जाण्यासाठी मार्डी रस्त्यालगत असलेल्या हेलिपॅड परिसरातील बसस्थानवरुन जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यावर्षी सातारा विभागाने यात्रेसाठी 93 जादा बसेसचे नियोजन केले असून 70 हजार 500 किलोमीटर अंतर पूर्ण करून 45 लाख 83 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.