सातार्‍यातील 93 जण तडीपार; 300 जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव सादर

0
36
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुका व बोरगाव पोलिस ठाणेअंतर्गत 93 जणांच्या तात्पुरत्या तडीपारीचे आदेश सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांनी शुक्रवारी दिले. तसेच सातारा शहर, शाहूपुरी व सातारा तालुका पोलिस ठाणेअंतर्गत 300 जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिस अधिकार्‍यांनी सादर केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, फलटण, माण, कराड उत्तर, कराड दक्षिण व पाटण विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे धूमशान सुरू आहे. विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या कालावधीत जिल्ह्यासह त्या-त्या मतदारसंघात शांतता राहून कायदा व सुव्यवस्था आबाधित रहावी, यासाठी जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर काम करत आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे प्रत्येक मतदारसंघातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघ अत्यंत संवेदनशील बनले आहेत.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती तसेच पोलिस रेकॉर्डवर असलेल्या व्यक्तींकडून उपद्रव होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी महसूल विभागाकडे तडीपारीचे प्रस्ताव सादर केले आहेत. सातारा तालुका पोलिस स्टेशनचे पोनि निलेश तांबे व बोरगाव पोलिस स्टेशनचे सपोनि रवींद्र तेलतुंबडे यांनी सादर केलेल्या प्रस्तावांना सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांनी मंजुरी देत 93 जणांच्या तात्पुरत्या तडीपारीचे आदेश दिले आहेत. या व्यक्तींना दि. 17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत सातारा व कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून तडीपार करण्यात आले आहे.

केवळ मतदान करण्यासाठी सकाळी 9 ते दुपारी 12 या 3 तासांच्या वेळेत संबंधितांना मतदान केंद्रावर मतदान करता येईल. तडीपारीचे प्रस्ताव सादर झाल्यानंतर संबंधितांची पडताळणी करण्यात आली. पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने खात्री केल्यानंतर सातारा प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तहसीलदार नागेश गायकवाड यांनी तडीपारीसंदर्भात निर्णय घेतला. दरम्यान, सातारा शहर, शाहुपूरी व सातारा तालुका पोलिस स्टेशनअंतर्गत पोलिस अधिकार्‍यांनी 300 जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात आणखी तडीपारीचा धमाका होणार आहे.