सातारा प्रतिनिधी । वाढत्या उष्माघातामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. अशात ग्रामीण भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. अशात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देणारी एक गोष्ट घडली असून गावोगावो नळजोडणीद्वारे ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत जिल्ह्यातील 927 गावांत नळजोडणी पूर्ण करण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत २०२२-२३ वर्षात 185 कोटी खर्च झाले असून जिल्ह्यातील ही योजना सध्या प्रगतिपथावर आहे.
१५ ऑगस्ट २०१९ला ‘जलजीवन मिशन’ची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली होती. ‘हर घर जल’ असे म्हणत प्रत्येक घरात नळजोडणीद्वारे प्रतिमाणसी ५५ लिटर शुद्ध पाणी देण्याचे या मिशनचा मुख्य उद्देश होता. सातारा जिल्ह्यातही या मिशनला जोमाने सुरुवात झाली आहे. यासाठी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून कामे सुरू आहेत.
जिल्ह्यात कुटुंबांची संख्या ६ लाखांहून अधिक आहे. या घरात नळजोडणीद्वारे माणसी ५५ लिटर स्वच्छ आणि शुद्ध पाणी शुद्ध पाणी पुरवण्यात येणार आहे. सध्या या मिशनअंतर्गत जिल्ह्यातील कामाने वेग घेतला आहे. सद्य:स्थितीत सातारा जिल्ह्यात १ हजार ५५६ योजना आहेत. यामधील १ हजार ५३३ योजनांना मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे योजनेतून सुरू झालेली कामे प्रगतिपथावर ही असल्याचे दिसून येत आहे.
1 हजार 431 कामे सुरू…
सातारा जिल्ह्यात जलजीवन मिशनची कामे वेगात सुरू आहेत. 1 हजार 533 कामांना मंजुरी मिळाली असून, त्यातील 1 हजार 431 सुरू झालेली आहेत. तर 102 कामे काही अडचणींमुळे सुरू झाली नाहीत. पाटण तालुक्यात सर्वाधिक 312 कामे सुरू झालेली आहेत. यानंतर कराड तालुक्यात 198, सातारा 175, खटाव 126, जावळी 110, वाई 106, कोरेगाव तालुका 97, फलटण 96, महाबळेश्वर 8, माण तालुका 76 आणि खंडाळा तालुक्यात 54 कामे सुरू आहेत.