सातार प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात प्रशासनाकडूनही जय्यत तयारी सुरू आहे. कोरेगाव तसेच माण विधानसभा मतदारसंघात उमेदवार संख्या वाढल्याने ९०३ अतिरिक्त मतदान यंत्रांची आवश्यकता भासणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही मतदानयंत्रे उपलब्ध करून दिली आहेत. त्या मतदान यंत्रांची तपासणी आली असून त्या-त्या मतदारसंघात त्या मतदान यंत्रांचे वितरणही करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात रेकॉर्ड ब्रेक उमेदवारी अर्ज दाखल झाले. उमेदवारी माघार घेण्याच्या कालावधीत बऱ्याच इच्छुकांनी अर्ज काढून घेतले. मात्र कोरेगाव विधानसभा मतदारसंघात १७ तर माण विधानसभा मतदारसंघात २१ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले. मतदारसंघात नोटासह १५ पेक्षा जादा उमेदवार असतील तर त्याठिकाणी दुसरे मतदान यंत्र जोडावे लागते.
मतदान यंत्रावर फक्त पंधराच उमेदवारांची नावे बसू शकतात. त्यापेक्षा जादा उमेदवार असतील तर त्याठिकाणी तेवढीच अतिरिक्त मतदान यंत्रे द्यावी लागतात. त्यामुळे कोरेगाव व माण विधानसभा मतदारसंघात निवडणूक अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली. कोरेगावमध्ये ४३८ तर माण विधानसभा मतदारसंघात जादा ४६५ बॅलेट युनिट (बीयू) देण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली या मतदान यंत्रांचे फर्स्ट लेव्हर चेकिंग (एफएलसी) करण्यात आले असून त्याचे रेंडमायझेशनही झाले आहे.
त्या त्या मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या ताब्यात ही यंत्रे देण्यात आली आहेत. वाई तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी १५ उमेदवार आहेत. या मतदारसंघात उमेदवारांची संख्या काठावर आहे. सातारा आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी ८ उमेदवार आहेत. फलटणमध्ये १४ तर पाटणमध्ये ११ असे जिल्ह्यात १०९ उमेदवार नशीब आजमावत आहेत. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात ४ हजार ६९८ बॅलेट युनिट (बीयू), ३ हजार ७९५ सेंट्रल युनिट (सीयू) व ४ हजार १११ व्हीव्हीपॅटचे वितरण करण्यात आले आहे.