सातारा प्रतिनिधी । सध्या डिसेंबर महिना आणि हिवाळा ऋतू असल्याने पहाटेच्यावेळी सर्वत्र धुक्याची झालर पहायला मिळत आहे. या धुक्यात मग मनमोकळेपणानं फिरण्यासाठी अनेकजण घराबाहेर पडत आहेत. मात्र, याच धुक्यांसह पर्यटनस्थळी प्री वेडिंग फोटोशूट काढण्याचे नवीन ट्रेंड सध्या चांगलाच वाढलं आहे. लग्नाच्या पवित्र बंधनात अडकण्यापूर्वीचे सुंदर क्षण टिपण्यासाठी प्री वेडींग फोटोशूट एखाद्या खास ठिकाणी व्हावं, असं प्रत्येकाला वाटत आहे. म्हणूनच प्री वेडींग शूटसाठी परफेक्ट ठिकाणांचा शोध सारेच घेत असतात. सातारा जिल्ह्यात खास करून मोजकी अशी ९ ठिकाणे आहेत. त्या ठिकाणी तिन्हीही ऋतूत चांगल्या प्रकारे प्री वेडींगचे फोटो किंवा व्हिडीओ शूट केले जाऊ शकतात. तर मग जाणून घेऊया त्या ठिकाणांबद्दल…
1) महाबळेश्वर (Mahabaleshwar) –
सातारा जिल्ह्यातील एक अत्यंत थंड हवेचे ठिकाण अशी महाबळेश्वरची ओळख. हे प्रसिद्ध हिलस्टेशन असून येथे अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही प्री वेडींग फोटोशूट करू शकता. या ठिकाणी असलेल्या अनेक पॉईंटच्या ठिकाणी उत्तम प्रकारे प्री वेडिंग शूट करता येऊ शकते. याशिवाय वेण्णा लेक या ठिकाणी आकर्षक असे बोटिंग करता येऊ शकते. महाबळेश्वरमध्ये मुख्य आकर्षणाचे ठिकाण असलेल्या वेण्णा लेक येथे गुलाबी थंडीचा अनुभव घेत नौकाविहार व हॉर्स रायडींगचे फोटोशूटही करता येऊ शकतात.
2) पाचगणी (Panchgani) –
महाबळेश्वरपासून जवळच असलेले छोटेसे शहर म्हणून पाचगणी हेही प्री वेडिंग शूटसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी उत्तम प्रकारे प्री वेडिंग शूट करता येऊ शकते. येथील टेबललॅण्ड तसेच परिसरातही प्री वेडींग फोटो शूट करता येईल.
3) वाई (Wai) –
पाचगणी, महाबळेश्वरच्या वाटेवरच असलेल्या वाईत अनेक हिंदी तसेच मराठी चित्रपटांचे शुटींग होत असतात. येथील गणपती मंदिराच्या परिसरातील कृष्णा नदीच्या घाटावर तुम्ही प्रीवेडींग करू शकता. वाई कृष्णा नदीच्या काठावर असलेले एक धार्मिक क्षेत्र आहे. काही जण वाईला दक्षिण काशी मानतात. सरदार रास्ते यांनी 1762 मध्ये बांधलेले, एकाच दगडातून सलगपणे घडविलेली मूर्ती असलेले वाईचे ढोल्या गणपतीचे मंदिर प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक चित्रपटांचे चित्रीकरणही झाले आहे. येथील नदीकाठीही मोठ्या पायऱ्यांवर बसून फोटोशूट करता येऊ शकते.
4) संगम माहुली (Sangam Mahuli) –
कृष्णा नदीचं विस्तृत पात्र, दुतर्फा हिरवीगार झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट आणि या सानिध्यात वसलेलं प्राचीन मंदिर. संगम माहुली हे सातारा शहरापासून अवघ्या 5 किमी अंतरावर आहे. मराठा स्थापत्य शैलीत कोरलेला आणि 18व्या आणि 19व्या शतकातील अनेक मंदिरांचा समावेश येथील परिसरात होतो. या ठिकाणाचं पावित्र्य राखत पारंपारिक पद्धतीने प्री वेडींग फोटोशुट केले तर ते संस्मरणीय ठरेल.
5) कास पुष्प पठार (Kas Platue) –
कास पुष्प पठारावर जगभरातील लोक भेट देण्यासाठी येत असतात. कास पठार हे महाराष्ट्रातील सातारा शहराच्या पश्चिमेला 25 कि.मी. अंतरावर आहे. हे पठार दरवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान विविध प्रकारच्या वन्यफुलांनी बहरले जाते तसेच येथे रंगीबेरंगी फुलपाखरे दिसून येतात. त्यामुळे हे ठिकाण सातारा जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळांतील मुख्य आकर्षण थरले आहे. पठारावर जवळ जवळ 850 हून अधिक प्रजातीच्या फुलांच्या प्रकारांची ओळख पटलेली आहे. येथील फुलाच्या व गवतामध्ये चांगल्या प्रकाराने प्री वेडिंग शूट करता येते.
6) ठोसेघर धबधबा (Thosegar Waterfall) –
सातारा जिल्ह्यातील ठोसेघर धबधबा परिसरात अनेक ठिकाणे आहेत. जिथे तुम्ही प्री वेडींग फोटो शुट केली जाऊ शकते. ठोसेघर धबधबा हा सातारकरांचे सर्वात आवडतं पर्यटन स्थळ आहे. याठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांची मांदियाळी असते. सातारा शहरापासून अवघे 25 किलोमीटर अंतरावर ठोसेघर आहे. दोन हजार फूट कोसळत असलेले पांढरे शुभ्र पाणी पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात. या ठिकाणी लग्नापूर्वी प्री वेडिंग शूट करण्यासाठी अनेकजण येतात.
7) चाळकेवाडी (Chalakewadi) –
सातारा जिल्ह्यातील चाळकेवाडी येथील पवनचक्क्यांचे जाळे पाहून पाहुण्यांना अप्रतिम वाटते. येथील वातावरण आणि उतार आपल्याला ताजी हवा प्रदान करतात. येथे मोकळ्या पठारावरील वाहणारी थंड आणि शुद्ध हवा आपले मन ताजेतवाने करून टाकते. सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वोत्तम ठिकाण हे आहे. या ठिकाणी प्री वेडिंग शूट करण्यासाठी चांगली गर्दी होत आहे.
8) बामणोली (Bamnoli) –
साताऱ्यापासून 36 किलोमीटर अंतरावर बामणोली हे एक छोटेसे शांत आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेले गाव. या गावाच्या सभोवताल शिवसागर तलाव आहे. या ठिकाणी नौकाविहार उपक्रमांचा आनंद घेऊ शकता किंवा शांत सहलीचा आनंद घेत बसू शकता. तसेच या ठिकाणी प्री वेडिंग शूट करता येऊ शकते.
9) नेहरू गार्डन, कोयना नगर – (Nehru Garden, KoynaNagar)
सातारा जिल्ह्यातील कोयनाधरण येथील नेहरू गार्डन हे पर्यटन स्थळ खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला पुणे बेंगलोर महामार्गाने उंब्रजमधून (कराड) उजवीकडे वळूण चिपळूण रस्त्याने जावे लागते. कोयना नगर उंब्रजपासून साधारण 60 किमी अंतरावर आहे. तसेच नेहरू गार्डन कोयना नगरपासून 2 किमी अंतरावर आहे. या याठिकाणीही अनेक पर्यटक नौका विहार करण्यासाठी तसेच फोटोशूट करण्यासाठी येतात.