सातारा प्रतिनिधी । राज्य परिवहन महामंडळातून प्रवास करणाऱ्यांना विविध योजनेतून सवतल दिली जाते. यामध्ये ठरावीक कागदपत्रे दाखविले की सवलतीच्या दरात प्रवास करता येतो. मात्र, बहुतांश प्रवाशांकडे आधार कार्ड किंवा इतर कागदपत्रे नसतात. त्यामुळे चालकांना नोकरी जायची भीती सतावत आहे. ठरलेले कागदपत्रे द्या नाही तर पूर्ण तिकीट घ्या, हा साधा पर्याय दिला जात आहे.
राज्य शासनाकडून एसटीने प्रवास करणाऱ्या विविध घटकांतील नागरिकांना सवलत देऊ केली आहे. यामध्ये ६५ ते ७५ वयोगटातील नागरिकांना सवलतीत पन्नास टक्के, तर ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास करता येतो, तसेच महिलांना प्रवास भाड्यात पन्नास टक्के सवलत जाहीर केली आहे. यासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड दाखविणे आवश्यक आहे. अनेकांकडे यातील कोणतीच कागदपत्रे नाहीत. आहेत त्यावरील काहीच वाचता येत नाही त्यामुळे त्यांच्यासमोर मोठी समस्या निर्माण होते.
६५ ते ७५ वयोगटासाठी ५० टक्के सवलत
राज्यातील ६५ ते ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्याना प्रवास दरात पन्नास टक्के सवलत लागू केली आहे.
यासाठी केवळ आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
७५ वर्षानंतर करता येणार प्रवास मोफत
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ राज्य शासनाने ७५ पेक्षा जास्त वय असल्यास मोफत प्रवास लागू केली आहे.
एसटीची स्मार्ट कार्ड सुविधाही उपयुक्त
राज्य परिवहन महामंडळाकडून सवलतधारकांसाठी स्मार्ट कार्ड आणले होते. कार्ड स्कॅन केले तर सर्व माहिती अवगत होत होती. मात्र, यासाठी भागीदार असलेल्या बँकेने काढता पाय घेतल्याने स्मार्ट कार्ड योजना गेल्या दोन वर्षांपासून बारगळली आहे. ही सुविधा उपयुक्त होती.
वय पडताळणीसाठी ‘आधार’ गरजेचे
एसटी महामंडळाकडून दिली जाणारी योजना वयावर आधारित आहे. त्यामुळे ‘आधार’ गरजेचा आहे.
आधार’ नसल्यास ही कागदपत्रे चालणार
ज्या ज्येष्ठ नागरिकांकडे आधार कार्ड नसेल तर त्यांनी पॅन कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, मतदान ओळखपत्र असले तरी पुरेसे ठरू शकते. त्यांचा वापर करता येईल. ‘डिजीलॉकर’ही वापरता येणार अनेकांकडे या कागदपत्रांची पत्र नसल्यास ‘डिजीलॉकर’ चालू शकते. काही जण स्वतः मोबाइलमध्ये फोटो काढून ठेवतात, तेही ग्राह्य धरले जातात.