कराड प्रतिनिधी । संतोष गुरव
काल गुरुवारी दि. 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिनाचे (World Sparrow Day) औचित्य साधत एक महत्वाचा ऑनलाईन सर्व्हे करण्यात आला. सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यात ऑनलाइनच्या माध्यमातून पक्षीप्रेमी नागरिक व विद्यार्थ्यांच्या वतीने चिमणीबाबत निष्कर्ष नोंदवण्यात आले. त्यानुसार तिन्ही जिल्ह्यात तब्बल ८ हजार ७२३ इतक्या चिमण्या प्रत्यक्ष पाहिल्या गेल्या. एकंदरीत तिन्ही जिल्ह्यात चिमण्यांचे प्रमाण कमी झाले असले तरी चिवचिवाट मात्र, अजूनही असल्याचे दिसून आले.
२० मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त कराड तालुक्यातील विद्यानगर येथील विज्ञान प्रसारक व पक्षी अभ्यासक डॉ. सुधीर कुंभार यांच्या वतीने चिमण्यांची गुगल फॉर्मच्या माध्यमातून गणना केली. यावेळी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ५१३ पक्षीप्रेमी नागरिक आणि विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेत आपले निरीक्षण नोंदवले.
चिमण्यांची चिवचिव कानी पडल्याशिवाय खेड्यातीलच नव्हे तर शहरातील सकाळही कधी उजाडलेली नाही. मात्र चिमण्यांचा चिवचिवाट शहरात कमी ऐकू येऊ लागला असला तरी ग्रामीण भागात चिमण्यांची संख्या कमी स्थिरच आहे. शहरातील चिमण्यांची संख्या कमी झाली असली तरीग्रामीण भागात मात्र जास्त आहे. दरम्यान, चिमणी निरीक्षणात ५१३ पक्षीप्रेमी नागरीक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपले निष्कर्ष नोंदवले. यामध्ये सातारा जिल्ह्यातून ५४%, सांगली जिल्ह्यातील १७%, कोल्हापूर जिल्ह्यातील ६ % तर इतर भागातुन २३% लोकांनी या चिमणी निरीक्षणाच्या सर्व्हेत सहभाग घेतला.
सातारा, सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात ८७२३ दिसल्या चिमण्या
काळ गुरुवारी घेण्यात आलेल्या चिमणी निरीक्षण सर्व्हेमध्ये निरीक्षणानुसार सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ८७२३ इतकी चिमण्यांची संख्या आढळून आली. यामध्ये घराबाहेर ४१%, झाडावर २६%, घरात १०% शेतात जंगलात सार्वजनिक ठिकाणे बागा रस्ते १२% अशी ठिकाणी चिमणी दिसून आल्या.
सर्वात कमी पावसाळ्यात होते चिमण्यांचे दर्शन
यावेळी घेण्यात आलेल्या निरीक्षणात कोणत्या ऋतूत जास्त चिमण्या दिसतात याबाबत देखील पक्षीप्रेमींनी आपले मत मांडले. यामध्ये २८% च्या मते उन्हाळा ऋतूत चिमण्या दिसतात. तर २८ टक्के मते हिवाळा ऋतूत दिसतात. ९% निरीक्षकांनी पावसाळ्यात तर ३५% निरीक्षकांना वर्षभर चिमण्या दिसतात असे निरीक्षण नोंदवले.
पक्ष्यांच्या खाण्या पिण्याची घेतली जाते काळजी
यावेळी नोंदवण्यात आलेल्या पक्षी निरीक्षणात उन्हाळ्यात ९२% ठिकाणी लोक पाण्याची सोय पक्षासाठी करतात, तर ८९% लोक धान्य ठेवत असल्याचे निरीक्षण अंती स्पष्ट करण्यात आले आहे.
अशा ठिकाणीच आढळते चिमण्यांचे वास्तव्य
निरीक्षकांनी सर्व्हेक्षणात नोंदविलेली माहितीनुसार चिमण्यांनी घरात केलेल्या घरट्याची संख्या हि १९५ इतकी आहे तर घराबाहेर बागेत ५१० ठिकाणी तर विविध ठिकाणी झाडावर केलेली घरटी १३०० इतक्या संख्येने आढळली आहेत.
तसेच परिसरात कृत्रिम घरटी २४ ठिकाणी तयार करून लावलेली आढळली.
चिमण्यांच्या संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक : डॉ. सुधीर कुंभार
काल २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिनानिमित्त आपल्या परिसरातील दिवसभरात दिसणाऱ्या चिमण्यांची नोंदीची एक मोहीम राबविली असता त्यामध्ये सातारा ,सांगली,कोल्हापूर या जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या चिमण्यांची संख्या आणि वसतिस्थाने याबाबत माहिती मिळाली. यातून ५१३ पक्षीप्रेमींनी निरीक्षण नोंदवले. त्यातून काहीशा प्रमाणात चिमणी गणना करता आली. हि मोहीम यापुढे चालू ठेवणार असल्याची प्रतिक्रिया विज्ञान प्रसारक व पक्षी अभ्यासक डॉ. सुधीर कुंभार यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.
पक्षी निरीक्षक व पक्षी प्रेमींनी केलेल्या सूचना
१) वृक्षतोड थांबवली पाहिजे, छोटी छोटी झाड झुडपं वाढवली पाहिजेत.
२) वनवा न लावता पाणवठे वाढविणे गरजेचे आहे.
३) घेरेदार झाडांची लागवड तसेच नैसर्गिक आदिवासामध्ये वाढ करणे आवश्यक
४) घराच्या बाहेर वेली, वृक्ष लावणे गरजेचे आहे.
५) जास्तीत जास्त लोकांना चिमण्याचे महत्त्व समजावून सांगने आवश्यक आहे.
६) शाळा, महाविद्यालयमध्ये चिमणी संवर्धनबाबत मार्गदर्शन व्हावे.
७) सामाजिक संघटनानी “चिमणी संवर्धन मोहीम राबवावी.
८) चिमण्यांच्या संवर्धनासाठी लाकडी किंवा मातीची घरटी बनवून निवारा करावा
९) डी. जे. डॉल्बी अशा ध्वनी वर्धक सिस्टिमवर बंदी घालावी,
१०) चिमण्यांना आहारामधील तांदळाचे व इतर धान्याचे तुकडे टाकले जावेत.
११) चिमण्यांना पाणी पिण्यासाठी मातीच्या पसरट भांड्यात स्वच्छ पाणी ठेवावे.
१२) पिकांवर रासायनिक कीटकनाशके व तणनाशके वापरणे टाळावे.
१३) रेडीएशन करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू टाळणे
१४) मोबाईल फोनचा वापर कमी करणे तसेच वृक्षांच्या ठिकाणी मोबाईल टॉवर नसावा.