सातारा प्रतिनिधी | दूध उत्पादक शेतकऱ्यांना ऐन दुष्काळात दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला आहे. राज्य सरकारने लिटरमागे पाच रुपयांचे अनुदान दिले होते. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ८२ हजार २६१ शेतकऱ्यांच्या खात्यावर १३ कोटी ८९ लाख दूधाचे अनुदान जमा झाले आहे. आतापर्यंत ८५ टक्के शेतकऱ्यांना अनुदान मिळाले असून उर्वरित शेतकऱ्यांचे खाते क्रमांक व अन्य तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर अनुदान जमा होणार आहे.
दिनांक ११ जानेवारी ते १० मार्च या दोन महिन्यांच्या कालावधीत शासनाने पाच रुपये अनुदान देण्याची योजना सुरु केली होती. मात्र, तांत्रिक कारणांनी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यास अडथळे येत होते. जिल्ह्यातील काही शेतकरी शेजारील जिल्ह्यात दूध संघांना दूध पुरवठा करत आहेत. अशा शेतकऱ्यांची माहिती संकलित करुन त्यांनाही अनुदानाचा लाभ दिला जात आहे. एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने मुदत वाढविली आहे. त्यामुळे या योजनेसाठी ऑनलाइन प्रक्रिया केलेल्या शेतकऱ्यांना दूध अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
अशी आहे आकडेवारी
1) एकूण जनावरे : २ लाख ८४ हजार ८५०
2) एकूण लाभ मिळालेले शेतकरी : ८२ हजार २६१
3) अनुदान मिळालेले दूध : दोन कोटी ७८ लाख ३६ हजार ८८४
4) मिळालेले अनुदान : १३ कोटी ८९ लाख ७९ हजार ६३५ रुपये
८५ टक्के शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर अनुदान जमा