सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील नागरिकांना मोफत वीज देण्यासाठी महावितरणकडून ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ राबविण्यास सुरुवात केलेली आहे. या योजनेत सहभागी होऊन घराच्या छतावर सौर प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांना आता महावितरणतर्फे मोफत नेट मीटर दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आपल्या प्रकल्पात किती वीजनिर्मिती झाली व घरामध्ये किती विजेचा वापर झाला, याची अद्ययावत माहिती मोबाइल अॅपवर मिळत आहे.
कोणाला घेता येतो योजनेचा लाभ?
लघु व उच्चदाब ग्राहक, गृहनिर्माण संस्था, उद्योजक तसेच विविध शासकीय, खासगी आस्थापना आदींना या योजनेचा लाभ घेता येतो. गृहसंकुलासाठी ५०० किलोवॅटपर्यंत सौर प्रकल्प उभारता येऊ शकतो.
सातारा जिल्ह्यात 8 हजार 743 ग्राहक
जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, उच्चदाब, सार्वजनिक पाणी योजना, पथदिवे आदी वर्गवारीतील ८ हजार ७४३ ग्राहक ‘सोलर रुफ टॉफच्या माध्यमातून वीजनिर्मिती करू लागले आहेत. या ग्राहकांच्या सौर प्रकल्पाची एकूण स्थापित क्षमता २७३ मेगावॅट इतकी आहे.
योजनेतून नेमकं किती मिळतंय अनुदान?
निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रतिकिलोवॅट ३० हजार रुपये अनुदान दोन किलोवॅटपर्यंत मिळते. तीन किलोवॅटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी १८ हजार रुपये अनुदान मिळते. तीन किलोवॅट पेक्षा मोठ्या प्रकल्पासाठी एकूण अनुदान ७८ हजार रुपये आहे.
योजनेच्या लाभासोबत आता नेट मीटर मोफत
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत ग्राहकाच्या छतावर बसविलेल्या सौरऊर्जा प्रकल्पात किती वीज तयार झाली, ग्राहकाने घरात किती वीज वापरली व किती अतिरिक्त वीज ग्राहकाकडून महावितरणला विकली गेली, याची नोंद करण्यासाठी एक वेगळा नेट मीटर बसवावा लागतो. आतापर्यंत त्याचा खर्च ग्राहकाला करावा लागत होता. आता महावितरणने ग्राहकांना सोलर नेट मीटर विनामूल्य दिला जात आहे.
1 कोटी घरांना प्रकाश देण्याचे उद्दिष्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ फेब्रुवारी २०२४ रोजी पीएम सूर्य घर: मुफ्त बिजली योजनाची घोषणा केली. ही रूफटॉप सोलर योजना आहे. ज्यामध्ये ७५,००० कोटींहून अधिक गुंतवणुकीच्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरवून १ कोटी घरांना प्रकाश देण्याचे आहे.
सूर्यघर मोफत योजनेसाठी 647 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर
राज्यामध्ये आतापर्यंत 2,37,656 वीज ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविले असून त्यांची एकूण क्षमता 2738 मेगावॅट आहे. त्यामध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या 81,938 ग्राहकांचा व त्यांच्या एकूण 323 मेगावॅट क्षमतेचा समावेश आहे. या ग्राहकांना 647 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घरावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसविणाऱ्या घरगुती ग्राहकांना केंद्र सरकारकडून थेट अनुदान मिळते. एक किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी 30 हजार रुपये, दोन किलोवॅट क्षमतेसाठी 60 हजार रुपये आणि तीन किलोवॅट क्षमतेसाठी 78 हजार रुपये अनुदान मिळते. महावितरणने या योजनेत घरगुती वीज वापरासाठी सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसविणाऱ्या ग्राहकांना मोफत नेट मिटर देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://www.pmsuryaghar.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करता येते.