कराड प्रतिनिधी । किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या तुफान मारामारीत एक जण जखमी झाल्याची घटना कराड तालुक्यातील वहागाव येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी तळबीड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. वहागावचे सरपंच संग्राम अधिकराव पवार यांच्यासह दोन्ही गटांतील मिळून आठ जणांवर शिवीगाळ, दमदाटीसह मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ऋषिकेश संपत जाधव (रा. वहागाव) असे मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदा संपत जाधव (रा. वहागाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ऋषिकेश जाधव यास वहागाव पुलाखाली सरपंच संग्राम पवार, त्यांचा भाऊ आनंदराव पवार, संदीप काकासाहेब पवार, अमित वसंत पवार (सर्व रा. वहागाव) हे शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण करीत होते. त्यावेळी माझ्यासह माझे पती संपत जाधव, मुलगा, कुटुंबीय आम्ही भांडणे सोडवण्यास गेलो असता संग्राम पवार याने ऋषिकेश यांचे डोक्यावर लोखंडी सळईने मारले. त्यावेळी मी मध्ये पडले असता, माझ्या पायावर तेथे आनंदराव अधिकराव पवार याने काठीने मारले व संग्राम पवारने तुला येथे राहू देत नाही, असे म्हणून ऋषिकेशला मारहाण केली, तसेच माझे दीड तोळ्याचे गंठण व कर्णफुले पडून गहाळ झालेले असून, ऋषिकेशने बँकेमधून २५ व हजार रुपये काढले होते. ते देखील भांडणात कोठेतरी पडून गहाळ झाले आहेत, तसेच ऋषिकेशने माहिती अधिकाराखाली वहागाव झोपडपट्टीचा काय विकास केला? याबाबतची माहिती मागविल्याच्या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी करून संग्राम पवार, आनंदराव पवार, संदीप पवार व अमित पवार यांनी मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, आनंदराव अधिकराव पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आमचे एकत्रित कुटुंब असून, माझा भाऊ संग्राम पवार हे वहागावचे सरपंच म्हणून तीन वर्षांपासून काम पाहात आहेत. दरम्यान, काल (ता. २४) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मी पुन्हा कराड येथे जात असताना ऋषिकेश व त्याचा भाऊ विकास जाधव हे वहागाव पुलाखाली थांबले होते. तेव्हा – ऋषिकेशने तेथे पडलेले लाकडी दांडके घेऊन मला व माझा भाऊ संग्राम यास मारहाण केली.
त्यावेळी नंदाताई जाधव व संपत जाधव यांनीही तेथे येऊन आम्हास शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्याने मारहाण केली. त्या वेळी त्या ठिकाणी हजर असलेले संदीप पवार, अमित पवार यांनी भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यात माझ्या खिशातील शेतीचे टोमॅटोचे बिलाचे ३५ हजार रुपये पडून गहाळ झाले आहेत. तसेच ऋषिकेश, विकास, नंदाताई जाधव, संपत जाधव (सर्व रा. वहागाव, ता. कऱ्हाड) यांनी पंप आम्हाला मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेची नोंद तळबीड पोलिसांत झाली आहे.