सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात ‘हे’ 8 उमेदवार उधळणार विजयाचा गुलाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा जिल्हा म्हणून साताऱ्याला ओळखले जाते. सध्या साताऱ्यातही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून जाहीर सभा, ठिकठिकाणी मेळाव्यांचे आयोजन आणि प्रचार रॅलीने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सातारा जिल्ह्यात एकूण ८ विधानसभा मतदारसंघ आहेत. यात कोणत्या मतदारसंघात कोणाचा विजयी झेंडा फडकेल? कोण कोण गुलाल उधळेल? हे काळात कळणार आहे.

१) सातारा विधानसभा मतदार संघ : सातारा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपकडून यावेळी पुन्हा पाचव्यांदा उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राजे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले तरी त्यांचा फॅनबेस कायम आहे. यंदा शिवेंद्रराजे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेच्या तर्फे अमित कदम मैदानात उतरलेत. आधीच शिवेंद्रराजेंचा एकहाती दबदबा, त्यात उदयनराजेंची साथ यामुळे यंदा शिवेंद्रराजे पाचव्यांदा आमदार होतील हे नक्की.

२) वाई विधानसभा मतदारसंघ : वाई विधानसभा मतदार संघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस दादा गटाचे नेते आणि विद्यमान आमदार मकरंद पाटील उभे असून त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी दिली. तर अपक्ष म्हणून पुरुषोत्तम जाधव हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अरुणादेवी पिसाळ या कै. मदनराव पिसाळ यांच्या सून असून जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा राहिल्या आहेत. अनेक वर्षांपासून पिसाळ कुटुंब राजकारण आणि समाजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे मकरंद आबांपुढे त्यांचं कडवं आव्हान आहे. मात्र मागील १५ वर्षापासून मकरंद पाटलांचा मतदारसंघावरील प्रभाव पाहता आबा यंदाही विषयाचा चौकार मारतील अशी शक्यता आहे. जर पुरुषोत्तम जाधव यांच्यामुळे मकरंद आबा यांना निवणूक जड जाईल आणि पिसाळ यांचा विजय होणार असे चित्र दिसत आहे.

३) कोरेगाव विधानसभा मतदार संघ : कोरेगाव मतदारसंघात दोन शिंदेंमध्ये लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर त्यांच्याविरोधात शिंदे गटाचे महेश शिंदे शड्डू ठोकून तयार आहेत. कोरेगाव मतदारसंघात यंदाही काटे कि टक्कर पाहायला मिळणार असून प्रचारसभा, मेळावे आणि नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्यात. शशिकांत शिंदेंकडे शरद पवारांप्रती असलेल्या निष्ठेचं कार्ड आहे, तर दुसरीकडे महेश शिंदेंच्या पाठीमागे मतदारसंघातील विकासकामे, मुख्यमंत्री शिंदेंची रसद आहे.या मतदार संघात राजकीय घडामोडी देखील जास्त घडताना पहायला मिळत आहेत. भाजपचे नेते नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्या अर्ज भरतेवेळी लावलेल्या हजेरीची देखील चर्चा चांगलीच रंगली आहे. मात्र, या याठिकाणी शशिकांत शिंदेंपेक्षा जास्त महेश शिंदेंनी कामे केली असल्याचे जनता सांगत आहे. त्यामुळे या ठिकाणी सध्या महेश शिंदे यांचं पारडं जड आहे.

४) फलटण विधानसभा मतदार संघ : फलटण विधानसभा मतदार संघात नुकताच राजकीय भूकंप झाला. या ठिकाणी अजित पवार यांनी उमेदवारी जाहीर केलेल्या आमदार दीपक चव्हाण यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी हातात घेतली. त्यामुळे या ठिकाणी दीपक चव्हाण यांच्या विरोधात अजित पवार गटाकडून सचिन कांबळे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. फलटण म्हंटल कि रामराजे हे जणू समीकरणच आहे. दीपक चव्हाण हे फलटणचे विद्यमान आमदार असले तरी रामराजेच फलटणचे किंगमेकर राहिलेत हे वेगळं सांगायला नको. शरद पवार गटाकडून आमदार दीपक चव्हाण तर युतीच्या माध्यमातून सचिन कांबळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रामराजेंच्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी, संस्थात्मक राजकारण आणि निंबाळकर घराण्याचे वलय यामुळे दीपक चव्हाण हेच पुन्हा फलटणचे आमदार होतील यात शंका नाही.

५) माण खटाव विधानसभा मतदार संघ : माण खटाव मतदारसंघात भाजपचे आमदार जयकुमार गोरे चाैथ्या विजयासाठी निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात आघाडीतील राष्ट्रवादीकडून माजी आमदार प्रभाकर घार्गे उतरलेत. याठिकाणी घार्गे यांच्या पाठीशी मोठ्या नेत्यांची ताकद उभी आहे. पण, येथे आघाडीतील नाराज शेखर गोरे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. गोरेंनी नुकतीच कार्यकर्त्याची बैठक घेत शरद पवार यांच्याबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे. आता नाराजी नंतर शेखर गोरे कोणाच्या पारड्यात मते टाकणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे. तरीही जयकुमार गोरे यंदाही आपली आमदारकी टिकवतील असे दिसत आहे.

६) कराड उत्तर विधानसभा मतदार संघ : कराड उत्तर विधानसभा मतदार संघात राष्ट्र्रवाई शरदचंद्र शरद पवार गटाकडून बाळासाहेब पाटील विरुद्ध भाजपचे मनोज घोरपडे असा सामना पाहायला मिळत आहे. यशवंत विचाराचा मतदारसंघ असलेल्या कराड उत्तर मतदार संघात संस्थात्मक राजकारण आणि शरद पवारांची साथ यामुळे बाळासाहेब पाटील आत्तापर्यंत ५ वेळा कराड उत्तरचे आमदार राहिलेत. मात्र, यंदाची त्यांच्यासाठी सोप्पी नक्कीच नाही. या ठिकाणी ‘मनो”धैर्य’ एकवटल्याने बाळासाहेबांना या निवडणुकीत चांगलीच कसरत करावी लागत आहे. मतदारांची नाराजी असणं आणि मतदारसंघात भाजपचं तयार झालेलं वातावरण यामुळे उत्तरेत यंदा कमळ फुलणार असे दिसत आहे. या गोष्टीमुळे बाळासाहेब पाटील यांना विजयासाठी यंदा मोठा संघर्ष करावा लागेल हे मात्र नक्की.

७) कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ : कराड दक्षिण विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण हे मागील १० वर्षांपासून कराड दक्षिणचे आमदार राहिलेत. त्यांच्याविरोधात भाजपकडून अतुल भोसले पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात कराडचा केलेला कायापालट, मतदारसंघात आधीपासूनच रुजलेली काँग्रेस विचारसरणी आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा स्वच्छ चेहरा हि त्यांची मुख्य बाजू आहे. तर दुसरीकडे अतुल भोसले हे देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील. साखर कारखाने, हॉस्पिटल, बँका, शाळा- कॉलेजेस या माध्यमातून भोसले कुटुंब थेट जनतेशी कनेक्टेड आहे. त्यामुळे यंदाही कराड दक्षिणेत काटे कि लढाई होईल हे नक्की.

८) पाटण विधानसभा मतदार संघ : पाटण विधानसभा मतदार संघाचा विचार केल्यास या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई विरुद्ध शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्यजित पाटणकर अशी लढत होईल असे सुरुवातीला वाटले होते. मात्र, या ठिकाणी महाविकास मतदार संघात उद्धव ठाकरे गटाकडे गेला. त्यामुळे या ठिकाणी ठाकरे आणि हर्षद कदम यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सत्यजित पाटणकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. सत्यजित पाटणकर यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे शंभूराज देसाई यांच्यासाठी सोप्पा असलेला पेपर आता अवघड बनला आहे. हर्षद कदम आणि शंभूराज देसाई या लढाईत शिवसेनेच्या मतात विभागणी होईल आणि त्याचा थेट फायदा पाटणकरांना होईल असं बोललं जातंय.. मात्र, हर्षद कदम किती मते मिळवण्यात यशस्वी होतील यावर शंभूराज देसाईंचा पराभव ठरेल.