कराड प्रतिनिधी । स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कराड येथील अलंकार उद्योग समुहाच्यावतीने यंदा वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ७८ आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अलंकार उद्योग समुहाच्यावतीने अलंकार हॉटेलच्या प्रांगणात ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. कराड मिलिटरी हॉस्पिटलचे कमांडिंग ऑफिसर कर्नल (नि.) नितीन शिनगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवावेळी अलंकार उद्योग समुहाने ७५ माजी सैनिकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिन साजरा करून त्यांचा सन्मान केला होता. देशासाठी आणि समाजासाठी योगदान देणाऱ्यांचा दरवर्षी स्वातंत्र्यदिनी सन्मान करण्याची संकल्पना अलंकार उद्योग समुहाचे प्रमुख दीपक अरबुणे यांनी सुरू केली आहे.
स्वातंत्र्यदिनी सकाळी विजय दिवस चौकातील विजयस्तंभावर कर्नल शिनगारे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली. तसेच श्री. जयदीप अरबुणे, सौ. आचल अरबुणे, श्री. मयुरेश्वर आणि सौ. पूजा शानभाग या नवदाम्पत्यांच्या हस्ते विजयस्तंभावर पुष्प अर्पण करण्यात आले. त्यानंतर हॉटेल अलंकारमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
यावेळी अलंकार उद्योग समुहाचे प्रमुख दीपक अरबुणे, विजय दिवस समारोह समितीचे अरूण जाधव, सलिम मुजावर, विलासराव जाधव, प्रा. बी. एस. खोत, माजी प्राचार्य गणपतराव कणसे, हेमंत पवार, रजनिश पिसे, महालिंग मुढेकर, विश्वास कांबळे, आप्पा पाटील, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक शीला खैरमोडे, तसेच अलंकार ग्रुपमधील गणेश कांबळे, संजय कांबळे, दिगंबर कांबळे, जयदीप अरबुणे, बजरंग कांबळे, दिनेश कांबळे, जयश्री अरबुणे, आचल अरबुणे, उल्का काजवे, आनंदी कांबळे, चंद्रिका कांबळे, निलीमा कांबळे आदी उपस्थित होते.