जिल्ह्यात एका दिवसात 78 वीजचोऱ्या उघडकीस; ‘महावितरण’च्या भरारी पथकाची धडक कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महावितरणकडून वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात वीजचोरी विरोधी एक दिवसीय विशेष मोहीम करीत राबविण्यात आली. यामध्ये सातारा जिल्ह्यात वीजचोरीच्या ७८ घटना उघडकीस आल्या असून, संबंधितांनी ५ लाख ७४ हजार रुपयांची वीज चोरी केल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले आहे.

पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांच्या निर्देशानुसार वीजचोरीविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांत या मोहिमेला सुरुवात झाली व सायंकाळी उशिरापर्यंत घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदी वर्गवारीतील वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ज्या उद्देशासाठी वीजजोडणी घेतली. त्याऐवजी वाणिज्यिक व इतर कारणांसाठी वापर सुरू असलेल्या वीजचोरी करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी वीज ग्राहकांकडून तब्बल ५ लाख ७४ हजार रुपयांचा अनधिकृतपणे वीजवापर केल्याचे उघडकीस आले आहे.

वीजचोरी व अनधिकृतपणे वीजवापर केल्याप्रकरणी संबंधितांना दंड व नवीन वीजबिल देण्यात येत आहे. या बिलाचा ताबडतोब भरणा करावा; अन्यथा नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा महावितरणच्या वतीने यावेळी देण्यात आला. थेट वीजचोरी प्रकरणात दंडात्मक रकमेसह वीजचोरीच्या संपूर्ण बिलाची रक्कम भरली नसल्यास फौजदारी कारवाई देखील केली जाणार आहे.