सातारा प्रतिनिधी । राज्यातील जेष्ठ नागरिकांना उतारवयात देवदर्शन करता यावं, कोणतीही आर्थिक अडचण पडू नये यासाठी शिंदे सरकारने मुख्यमंत्री ‘तीर्थ दर्शन’ योजना (Mukhyamantri Teertha Darshan Yojana) जाहीर केली होती. या योजनेतील पात्र नागरिकांचा प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे. योजनेनुसार ज्येष्ठ नागरिकांना प्रतिव्यक्ती ३० हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन अन् निवास व्यवस्था या खर्चाचा समावेश असून यासाठी सातारा जिल्ह्यातील ७४१ जण पात्र ठरले आहेत.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेट, दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांना राज्य आणि देशातील तीर्थस्थळांना भेट फायदेशीर ठरणार आहे. तीर्थदर्शन योजनेत राज्य व देशातील सर्व धर्मियांतील देवस्थान, चर्च, दर्गासह १३९ क्षेत्रांचा समावेश आहे.
या योजनेनुसार ज्येष्ठ नागरिकांना प्रति व्यक्ती ३० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.तसेच विभागाने ठरवून दिलेले निकष, सुविधांव्यतिरिक्त इतर सुविधा घ्यायच्या असतील, तर त्यासाठी अतिरिक्त आर्थिक भाराची जबाबदारी संबंधित ज्येष्ठ नागरिकाची राहणार आहे. तर ७५ वर्षांवरील वृद्धांना एक सहायकही मिळणार आहे. त्याचा खर्चही शासनाकडूनच करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यातील ‘या’ दोन तीर्थस्थळांचा समावेश
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतील पात्र नागरिकांचा प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत सातारा जिल्ह्यातील दोन तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री. काळेश्वर ऊर्फ काळूबाई मंदिर व माण तालुक्यातील शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव मंदिर या तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे.
लाभार्थीचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक
कुटुंबप्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपर्यंत असणे अनिवार्य) किंवा पिवळे, केशरी रेशन कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाइकाचा मोबाइल क्रमांक, योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र, ट्रॅक्टर वगळून इतर चारचाकी वाहन असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
60 वर्षे पूर्ण केलेल्यांसाठी आहे योजना
महाराष्ट्रातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. या ज्येष्ठ नागरिकांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची, दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राज्य शासनाने सुरू केली.
अर्जासोबत कोणती कागदपत्रे हवीत ?
योजनेच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज, लाभार्थ्यांचे आधार कार्ड अथवा रेशन कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, जन्मदाखला, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे • प्रमाणपत्र यापैकी कोणतेही • प्रमाणपत्र, ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला.
1 हजार 239 अर्ज आलेले; नवीन स्वीकारण्यास सूचना नाही
या योजनेसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतच्या मुदतीपर्यंत जिल्ह्यातून १ हजार २३९ अर्ज आले. तपासणीनंतर ७४१ पात्र ठरले आहेत. तर ७५ वर्षावरील वृद्धांना ४६ सहायक देण्यात येणार आहेत. नवीन अर्ज स्वीकारण्यास अद्याप शासनाकडून सूचना मिळालेली नाही.