जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त घोषित 2 तालुक्यातील 5 गावे अन् 3 वाड्यांना पाणीपुरवठा सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई महसूल उपविभागांतर्गत वाई, खंडाळा तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात सध्या १२० गावे ३८२ वाड्यांना ११६ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. दरम्यान, वाई तालुक्यातील ४९ आणि खंडाळा २५ अशी तब्बल ७४ गावे टंचाईग्रस्त घोषित असून सध्या वाई तालुक्यातील २ गावे व ३ वाड्या, तर खंडाळा तालुक्यातील ३ गावांमध्ये दोन शासकीय, चार खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

वाई तालुक्यात गुंडेवाडी, बालेघर अंतर्गत कासुर्डेवाडी, मांढरदेव अंतर्गत गडगेवाडी व अनपटवाडी तसेच खंडाळा तालुक्यात लोणंद नगरपंचायत, गोळेगाव व म्हावशी या ठिकाणी टँकरने एक दिवसाआड पिण्याचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या दोन्ही तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सात-सात विहिरी अधिग्रहण करण्यात आलेल्या आहेत.

प्रशासनाकडून टंचाईच्या उपाययोजनांबाबत आराखडा तयार

उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. गावागावातील विहिरींचे पाणी कमी होत आहे. त्यामुळे काही गावांतील लोकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी प्रशासन स्तरावर उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

वाई आणि खंडाळा तालुक्यातील ‘या’ गावाचा समावेश

वाई प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या आराखड्यात वाई तालुक्यातील बालेघर, चांदवडी (पुनर्वसन), मांढरदेव, गुंडेवाडी, बोपर्डी, परखंदी, वेरुळी, सुलतानपूर, वडोली, सुरूर, आनंदपूर, चांदक, शिरगाव, लगडवाडी, ओहोळी, डुईचीवाडी, वहागांव, गुळुंब, मुंगसेवाडी, विठ्ठलवाडी, चिखली, शेंदुरजणे, गाढवेवाडी, अमृतवाडी, ओझर्ड, गुंडेवाडी-पिराचीवाडी, धावडी, अनवडी, व्याजवाडी, पांढरेचीवाडी, वाघजाईवाडी (बावधन), किकली, जांभळी, खंडकी, निकमवाडी, राऊतवाडी, गोळेगाव/गोळेवाडी, आकोशी, बलकवडी, लोहारे, धोम पुनर्वसन, सटालेवाडी, बेलमाची खालची, भिवडी पुनर्वसन, गोवेदिगर, खावली, वेलंग, लगडवाडी-मापरवाडी, वाकणवाडी तसेच खंडाळा तालुक्यात हरीपूर (वाण्याची वाडी), लोहोम, पारगाव केसुर्डी, जवळे साळव, कोपर्ड, अंबारवाडी, कवठे, कर्नवडी, कण्हेरी, पाडेगाव, सुखेड, धावडवाडी, लिंबाचीवाडी, झगलवाडी, म्हावशी, खेड बु., वाठार बु, असवली, धनगरवाडी, बावडा या गावांचा समावेश आहे.

2 लाख 13 हजार नागरिक, सव्वा लाख पशुधनासाठी टॅंकर

जिल्ह्यात सद्यस्थितीत दोन लाख १३ हजार लोकसंख्या व एक लाख २३ हजार ८५ पशुधनाची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागत आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ५५ टँकर सुरू असून ५१ गावे, २९९ वाड्यांमध्ये ८९ हजार ९२२ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यात २४ गावे ९ वाड्या, फलटण तालुक्यात १९ गावे ६८ वाड्या, कोरेगाव तालुक्यात २२ गावे, वाई तालुक्यात दोन गावे, ३ वाड्या, खंडाळा व कराड तालुक्यात एका गावात तर पाटण तालुक्यात तीन वाड्यांवर टंचाइची परिस्थिती दिसून येत आहे. पाणी टंचाई निर्माण होणाऱ्या गावांमध्ये प्रशासनाकडून युध्दपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत.

असा आहे धरणातील पाणीसाठा

यावर्षी धरणांच्या पाणीसठ्यातही कमालीची घट झाली असल्याने दुष्काळाची दाहकता अधिक वाढणार आहे. नीरा-देवघर धरणातील पाणीसाठा 37.05 टक्क्यांवर (4.3 टीएमसी) आला आहे. भाटघर धरणात अजूनही 40.44 टक्के (9.5 टीएमसी) पाणीसाठा आहे. तर वीर धरणात 47.14 टक्के (4.4 टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध असून, गुंजवणीत 50.46 टक्के (1.9 टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध आहे. तर जिल्ह्यातील धोम धरणात (६.९२ टीएमसी), कण्हेर (३.७८ टीएमसी), कोयना (५७.९४ टीएमसी), बलकवडी (१.५० टीएमसी), उरमोडी २.६४ टीएमसी), तारळी ३.६० टीएमसी) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. याच पाण्यावर पावसाळा येईपर्यंत सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, माळशिरस आणि पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर या तालुक्यांमधील शेतकरी अवलंबून आहेत.