सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरलेल्या जिल्ह्यातील ७२८ पेक्षा अधिक वाहनांना सातारा, कराड व फलटण आरटीओकडून परवानगी देण्यात आली आहे. यावेळी प्रत्येक वाहनांची तपासणी कडक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सातारा, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, वाई, फलटण, कोरेगाव, माण या ८ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी प्रचारासाठी विविध वाहनांचा ताफा आरक्षित केला आहे.
प्रचार यंत्रणेत सहभागी असलेल्या वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवानगी आवश्यक आहे. वाहनांवर एलईडी लाईटस, स्पीकर, फ्लेक्स बसवण्याकरता आरटीओची परवानगी असणे आवश्यक आहे. त्यानुसार सातारा प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, कराड व फलटण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे विविध प्रकारच्या वाहनांनी परवानगी मागितली होती. त्यानुसार ७२८ पेक्षा अधिक वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.
विविध मतदारसंघात विधानसभा प्रचाराच्या कामासाठी अॅटो रिक्षा, छोटा हत्ती, बस, ट्रक, टेम्पो यासारख्या विविध वाहनांची गरज लागते. भाडेतत्त्वावर घेतलेल्या वाहनांवर एलईटी लाईटस्, स्पीकर, फ्लेक्स बसवून प्रचार केला जातो. या प्रचाराच्या वाहनांना आरटीओची परवानगी आवश्यक असून सातारा आरटीओने ७२८ पेक्षा अधिक वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.