सातारा प्रतिनिधी | शिधा पत्रिकाधारकांना ई- केवायसी बंधनकारक असून, यासाठी शिधापत्रिकाधारकांना ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, अद्याप सुमारे राज्यात २८ टक्के लाभार्थ्यांची ई-केवायसी शिल्लक आहे. त्यामुळे राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सातारा जिल्ह्यात ई-केवायसी करण्याचे काम गतीने सुरू असून, २२ टक्के लाभार्थ्यांचे ई-केवायसी अद्याप शिल्लक आहे.
रेशन धान्य लाभार्थ्यांचे १०० टक्के ई-केवायसी करून घेणे हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. राज्यात साधारण सरासरी ७२% लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली असून, अजूनही २८% होणे बाकी आहे. तसेच, सातारा जिल्ह्यात अद्यापही २२.१८ टक्के लोकांनी ई-केवायसी केली नाही. रेशन कार्ड ई-केवायसी करण्याची मोहीम शासनाने सहा महिन्यांपासून सुरू केली आहे. मध्यंतरी सर्व्हर डाऊनमुळे मोहिमेला गती नव्हती. शासनाने मुदतवाढ दिली आहे.
शासनाच्या अॅपवरही सुविधा उपलब्ध…
ई-केवायसीसाठी स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनद्वारे मोफत केवायसी केले जाते. परंतु, लहान मुले आणि वृद्धांच्या बोटांचे ठसे आणि डोळ्यांद्वारे स्कॅन करताना अडचणी येत आहेत. यामुळे शासनाने ‘मेरा ई-केवायसी’ अॅपही तयार केले आहे. त्यावरून दुकानात न जाता स्वतःचे आणि कुटुंबाचे केवायसी पूर्ण करणे शक्य आहे.
रेशन दुकानदार संघटनांनी देखील केलेय महत्वाचे आवाहन
ई-केवासयी न केल्याने जर धान्य बंद झाले, तर दुकानदारांना कोणीही दोष देऊ नये. मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप ही पूर्तता केली नसेल त्यांनी मुदतीत ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी जिल्हा रेशन दुकानदार संघटनेमार्फत केले आहे.
अद्याप ई-केवायसी बाकी…
जावळी : १९,३८१
कराड : ७४,५०१
खंडाळा : ११,३१९
खटाव : ४५,२७५
कोरेगाव : २६,४६४
म’श्वर : ८,७७२
माण : ३२,८४१
पाटण : ४९,६७१
फलटण : ४७,९२५
सातारा : ५६,८०९
वाई : २१,२६३
एकूण : ३,९४,२२१